'विराटपेक्षा माझ्या भावाची आकडेवारी उत्तम, फरक इतकाच की..'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

T20 World Cup Virat Kohli Numbers: कोहलीला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तो रोहितबरोबर सर्वच सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 17, 2024, 02:24 PM IST
'विराटपेक्षा माझ्या भावाची आकडेवारी उत्तम, फरक इतकाच की..'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा title=
एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं मत

T20 World Cup Virat Kohli Numbers: पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमालने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर स्वत:चा शर्टलेस फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याने सिक्स पॅक्स अॅब दाखवले होते. त्याच्यावर प्रकृतीसंदर्भात होणाऱ्या टीका करणाऱ्यांना टोला लगावताना हा फोटो पोस्ट केला आहे. असं असतानाच त्याचा भाऊ कमरान अकमलाने भावाची पाठराखण करत एक धक्कादायक विधान केलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील आकडेवारीचा संदर्भ देत कमरानने उमर अकमालची आकडेवारी ही भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीपेक्षाही उत्तम असल्याचं म्हटलं आहे.

विराटपर्यंत तो पोहचणारही नाही पण...

सोशल मीडियावर कमरानने केलेल्या या दाव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'एआरव्हाय न्यूज'शी बोलताना, उमर हा जागतिक स्तरावर विराट कोहलीने जेवढं नावलौकीक कमावलं आहे त्याच्या आजाबाजूलाही पोहोचणार नाही. मात्र त्याचा स्ट्राइक रेट भारतीय क्रिकेट स्टार असलेल्या विराटपेक्षाही जास्त आहे. त्याची टी-20 वर्ल्ड कपमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या विराटपेक्षाही अधिक आहे.

नेमकं काय म्हणाला कमरान?

"मला ही आकडेवारी काल मिळाली आहे. मी उमरबद्दल बोलत आहे. टी-20 वर्ल्ड कप सामन्यांमध्ये उमरची आकडेवारी ही विराटपेक्षा उत्तम आहे," असं कमरानने म्हटलं आहे. "उमर तर विराटच्या छोट्या बोटाएवढाच आहे. मात्र उमरचा स्ट्राइक रेट अधिक आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीपेक्षा त्याची सर्वोच्च धावसंख्या अधिक आहे."

विराट आणि उमर अकमलची आकडेवारी काय सांगते?

विराट आणि उमर अकमलची टी-20 वर्ल्ड कपमधील स्ट्राइक रेट पाहिला तर तो जवळपास सारखाच आहे. उमर अकमलचा स्ट्राइक रेट 132.42 इतका आहे तर विराटचा स्ट्राइक रेट 130.52 इतका आहे. मात्र उमर अकमालची वैयक्तिक धावसंख्या ही धोनीच्या धावसंख्येपेक्षा अधिक आहे. उमर अकमलने 2014 च्या टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाविरुद्ध 94 धावा केल्या होत्या. तर विराटची टी-20 मधील सर्वोच्च धावंस्ख्या नाबाद 89 इतकी आहे. त्याने ही धावसंख्या 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच केली होती. कमरानने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. भारतीय क्रिकेटपटूप्रमाणे उमर अकमलकडे पीआर कंपन्या नाहीत ज्या त्याची आकडेवारी आणि कामगिरीबद्दलच्या बातम्या व्हायरल करेल, असं कमरान म्हणाला आहे.

आपल्याकडे पीआर कंपन्या नाहीत

विराटपेक्षा माझ्या भावाची कामगिरी उत्तम आहे, फरक फक्त जाहिरातबाजीला असल्याचं कमरानने म्हटलं आहे. "आपल्याकडे पीआर कंपन्यानंतर आपण आपली आकडेवारी आणि कामगिरी सोशल मीडियावरुन शेअर करत नाही. हीच आकडेवारी आपल्या 15 खेळाडूंपैकी कोणाच्या नावे असती तर विचार करा. असं असतं तर आतापर्यंत वादळ उठलं असतं. मला याबद्दल विशेष वाटत नाही की त्यांनी विराटला टोमणा मारताना, 'मोठे खेळाडू आहे. त्याने अनेक शकतं लगावली आहेत,' असं म्हटलं असतं," अशी प्रतिक्रिया कमरानने नोंदवली.

पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर

पाकिस्तानी टी-20 वर्ल्ड कपमधून ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडला आहे. अमेरिका आणि भारताविरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला. त्यांनी कॅनडाला पराभूत केलं. दुसरीकडे विराट कोहलीला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तो रोहितबरोबर सर्वच सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडविरुद्ध विराटने 5 बॉलमध्ये 1 धाव केली. पाकिस्तानविरुद्ध विराट 3 बॉलमध्ये 4 धावा करुन तंबूत परतला तर अमेरिकेविरुद्ध तो पहिल्याच बॉलवर भोपळाही न फोडता बाद झाला.