close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टीम इंडियाचे बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग प्रशिक्षक ठरले

टीम इंडियाचे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग प्रशिक्षक हे निश्चित झाले आहेत.

Updated: Aug 22, 2019, 09:51 PM IST
टीम इंडियाचे बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग प्रशिक्षक ठरले

मुंबई : टीम इंडियाचे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग प्रशिक्षक हे निश्चित झाले आहेत. टीम इंडियाच्या निवड समितीने प्रशिक्षकांची पसंती बीसीसीआयला कळवली आहे. निवड समितीची ही पसंती बीसीसीआयने मान्य केल्यानंतर विक्रम राठोड टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षक होतील, तर भारत अरुण बॉलिंग प्रशिक्षक म्हणून आणि आर. श्रीधर फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून कायम राहतील. 

बॅटिंग प्रशिक्षकासाठी निवड समितीने विक्रम राठोड यांना पहिली पसंती, संजय बांगर यांना दुसरी पसंती आणि इंग्लंडच्या मार्क रामप्रकाश यांना तिसरी पसंती दिली. तर बॉलिंग प्रशिक्षकासाठी भारत अरुण यांना पहिली, पारस म्हामब्रे यांना दुसरी आणि वेंकटेश प्रसाद यांना तिसरी पसंती देण्यात आली. फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांना पहिली, अभय शर्मा यांना पहिली आणि टी. दिलीप यांना तिसरी पसंती देण्यात आली. 

निवड समितीने कळवलेली ही पसंती निश्चित झाल्यानंतर बीसीसीआय या सगळ्यांशी २ वर्षांचा करार करेल. २०२० सालच्या शेवटी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत या सगळ्यांना करारबद्ध केलं जाईल. रवी शास्त्री यांची याआधीच मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. 

प्रशिक्षकांची ही निवड बघितली तर फक्त संजय बांगर यांचीच गच्छंती झाली आहे. बांगर वगळता सगळे प्रशिक्षक हे तेच ठेवण्यात आले आहेत. वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूमुळे झालेला गोंधळ बांगर यांना डच्चू द्यायचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. तर मागच्या काही वर्षांमध्ये टीम इंडियाच्या बॉलिंगमध्ये शानदार सुधारणा झाली आहे, त्यामुळे भारत अरुण यांन कायम ठेवण्यात आलं आहे. पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हापासून हे नवे प्रशिक्षक टीम इंडियासोबत असतील.