Kolkata Rape: 'तुमच्या मुलींचं संरक्षण करण्यापेक्षा...'; इतर खेळाडू विषय टाळताना सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Suryakumar Yadav On Kolkata Rape Case: कोणताही सक्रीय क्रिकेपटू कोलकात्यामधील घृणास्पद कृत्यासंदर्भात भाष्य करण्यास तयार नसतानाच सूर्यकुमारने रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 19, 2024, 07:13 AM IST
Kolkata Rape: 'तुमच्या मुलींचं संरक्षण करण्यापेक्षा...'; इतर खेळाडू विषय टाळताना सूर्यकुमार स्पष्टच बोलला title=
सूर्यकुमार यादवने मांडली भूमिका

Suryakumar Yadav On Kolkata Rape Case: कोलकात्यामधील रुग्णालयात 31 वर्षीय शिकावू डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निघ्रृण हत्या केल्याचं प्रकरण देशभरामध्ये चर्चेत आहे. अनेकांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी या हिंसक घटनेचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. असं असतानाच सामान्यपणे अशा संवेदनशील विषयापासून भारतीय क्रिकेटपटू दूरच राहतात. मात्र भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने कोलकात्यामधील या हिंसक घटनेनंतर रोखठोकपणे आपली प्रतिक्रिया नोंदवली असून सध्या त्याने केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. 

कोणीच भूमिका घेत नसताना सूर्यकुमार समोर आला

कोलकात्यामधील घटनेनंतर महिलांनी सुरक्षित राहण्यासंदर्भात काळजी घेण्यापेक्षा ज्या पुरुषांमध्ये त्या अशा हिंसाचाराला बळी पडतात त्यांनाच समज दिली, अगदी लहान वयापासूनच तशी शिकवण दिली तर अधिक उपयोगाचं ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे. अशाच पद्धतीचं मत सूर्यकुमार यादवने व्यक्त केलं आहे. आपल्या कुटुंबातील पुरुषांनाच अधिक चांगली समज देण्याची, शिकवण देण्याची आणि संस्कार देण्याची गरज सूर्यकुमारने बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे कोलकात्यामधील या हिंसाचारानंतर फारसे क्रिकेटपटू किंवा खेळाडू उघडपणे व्यक्त झालेले नाहीत. असं असताना सूर्यकुमारने घेतलेली भूमिका अधिक महत्वाची ठरते असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

सूर्यकुमारने नेमकं काय म्हटलं?

सूर्यकुमारने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये पहिल्याच ओळीत, "तुमच्या मुलीचं संरक्षण करा" असं लिहिलेलं आहे. मात्र ही ओळ खोडून खाली "तुमच्या मुलाला शिकवण द्या" असं म्हटलं आहे. त्या खालोखाल, "आणि तुमच्या भावांना... आणि तुमच्या वडिलांना... आणि तुमच्या नवऱ्याला... आणि तुमच्या मित्रांनाही..." असं सूर्यकुमारने लिहिलेलं आहे. यामधून सूर्यकुमारने महिलांची सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्त मार्ग म्हणजे पुरुषांनाच अधिक चांगली शिकवण दिली पाहिजे असं अधोरेखित केलं आहे. 

दहा दिवसांपासून डॉक्टरांचं आंदोलन

कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये 9 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या कॉलेजच्या सेमीनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी सकाळी एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. या तरुणीच्या गुप्तांगावर जखमा होत्या. तसेच तिच्या तोंडातून, डोळ्यांमधून रक्तस्राव होत होता. तिच्या मानेचं हाड मोडलं होतं. तिच्या शरीराचे लचके तोडल्याप्रमाणे मृतदेहाची अवस्था होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी याच ठिकाणी काम करणाऱ्या पोलीस स्वयंसेवकाला मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे. यानंतर मागील 10 दिवसांपासून पश्चिम बंगलामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर काम बंद आंदोलन करत असून त्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे.