दुबई : T20 वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात ही विजेतेपदाची लढत होणार आहे. गेल्या एक महिन्यापासून जगभरातील संघांमध्ये सामने खेळले जात होते. त्यानंतर आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. या मोठ्या सामन्यासाठी अंपायर्सचीही घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारताच्या एका पंचावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 वर्ल्डकप फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचे मराइस इरास्मस आणि इंग्लंडचे रिचर्ड केटलबरो यांची शुक्रवारी मैदानी अंपयार म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्यामध्ये भारताचे नितीन मेनन टीव्ही पंचाची भूमिका बजावतील.
ICCने एका निवेदनात म्हटले आहे की, "अंपायर माराइस इरास्मस आणि रिचर्ड केटलबरो हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्या ICC पुरुष T-20 वर्ल्डकप 2021च्या अंतिम सामन्यासाठी मैदानावरील पंचांची जबाबदारी स्वीकारतील." पॅनेलमधील एकमेव भारतीय पंच ICC मेनन हे फायनलमध्ये टीव्ही पंच असतील तर श्रीलंकेचे माजी फिरकी गोलंदाज कुमार धर्मसेना हे चौथे पंच असतील.
मेनन त्याच्या पहिल्या मेन्स वर्ल्डकपमध्ये कामगिरी करत आहे. ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर रंजन मदुगले हे या सामन्याचे रेफ्री असतील.