हे क्रिकेटपटू करणार आयपीएलची मराठी कॉमेंट्री!

आयपीएलच्या मेगा-फायनलला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे

Updated: May 27, 2018, 05:37 PM IST
हे क्रिकेटपटू करणार आयपीएलची मराठी कॉमेंट्री! title=

मुंबई : आयपीएलच्या मेगा-फायनलला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या मॅचच्या आधी बॉलीवूड सेलिब्रिटी क्लोजिंग सेरिमनीमध्ये परफॉर्म करणार आहेत. याचबरोबर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलची कॉमेंट्री मराठीमध्ये करण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, अमोल मुजुमदार आणि चंदू पंडित तसंच क्रीडा समिक्षक सुनंदन लेले आयपीएलची कॉमेंट्री करणार आहेत. याचबरोबर मराठी अभिनेता स्वप्निल जोशी आणि माधुरी दीक्षित मॅच सुरु व्हायच्या आधी पाहायला मिळतील. माधुरी दीक्षित ही तिचा चित्रपट बकेटलिस्टच्या प्रमोशनसाठी येणार आहे. स्टार प्रहाववर आयपीएलची मराठी कॉमेंट्री पाहता येणार आहे.

चेन्नई-हैदराबादमध्ये मेगा-फायनल

२ महिने आणि ५९ मॅचनंतर आता आज आयपीएलच्या यंदाच्या वर्षातल्या दोन सर्वोत्तम टीम एकमेकांना भिडणार आहेत. धोनीच्या चेन्नईचा सामना केन विलियमसनच्या हैदराबादशी होणार आहे. याआधी चेन्नईनं २०१० आणि २०११ अशी दोन वेळा आयपीएल जिंकली होती. तर हैदराबादला २००९ आणि २०१६ साली आयपीएल जिंकता आली. पण २००९ साली हैदराबादच्या टीमचं नाव आणि मालक वेगळे होते. त्यामुळे यावर्षी विजय होणारी टीम ३ वेळा आयपीएल जिंकण्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. ३ आयपीएल जिंकण्याचं रेकॉर्ड सध्या मुंबईच्या नावावर आहे. मुंबईनं २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएल जिंकली होती.