2 सामने, 2 अर्धशतकं, 2 विजय, 14000 KM चा प्रवास... हे सारं 'त्याने' एका दिवसात केलं

This Player Scored 2 Fifties Across Continents In 24 Hours: मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा सलामीवर असून त्याने नुकतीच एक आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे रिझवानने अवघ्या 24 तासांच्या आत ही कामगिरी केलीय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 29, 2023, 01:43 PM IST
2 सामने, 2 अर्धशतकं, 2 विजय, 14000 KM चा प्रवास... हे सारं 'त्याने' एका दिवसात केलं title=
दोन्ही सामने तो ज्या संघांमधून खेळला त्यांनी जिंकले

This Player Scored 2​ Fifties Across Continents In 24 Hours: पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) क्रिकेटच्या मैदानात एक अनोखा पराक्रम केला आहे. रिझवान 24 तासांच्या आत म्हणजेच एका दिवसात 14 हजार किलोमीटरचा प्रवास करुन दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये 2 सामने खेळला. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे रिझवान ज्या संघांमध्ये होता त्या दोन्ही संघांनी हे दोन वेगवेगळे सामने जिंकले. 

कुठे खेळला हे सामने?

31 वर्षीय रिझवानने 27 जुलै रोजी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात नाबाद 50 धावा केल्या होत्या. खरं तर त्याचं नाव संघात नव्हतं पण तो ऐनवेळी रिप्लेसमेंट म्हणून सरफराज अहमदच्या जागी खेळला. पाकिस्तानने हा सामना जिंकला. 28 जुलै रोजी कोलंबोपासून 14 हजार किलोमीटर दूर कॅनडामध्ये खेळवण्यात आलेल्या टी-20 लीगमध्ये रिझवानने नाबाद अर्धशतक झळकावलं.

दमदार कामगिरी करत त्या संघालाही जिंकवलं

मोहम्मद रिझवान ग्लोबल टी-20 कॅनडा लीगमध्ये वेंकूवर नाइट्सच्या संघाकडून खेळत आहे. रिझवानच्या संघाने ब्रेम्प्टन वोल्व्सच्या संघाला 9 विकेट्स राखून पराभूत केलं. वोल्व्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 9 गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना वेंकूवर नाइट्सने अवघ्या 17.1 ओव्हरमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. रिझवान सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने 42 चेंडूंमध्ये नाबाद 52 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे कॉर्बिन बॉकने 41 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. रिझवान आणि कॉर्बिनने 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप केली. 

उत्तम टी-20 करिअर

रिझवानने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण 238 टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्याने 208 सामन्यांमध्ये फलंदाजी केली असून 44 च्या सरासरीने त्याने 6945 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांबरोबर 59 अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजेच त्याने एकूण 61 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 110 इतकी आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास रिझवानने 85 सामन्यांमध्ये 73 डावांत 49 च्या सरासरीने 2797 धावा केल्या. यात एक शतक आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट 127 इतका आहे.

बाबर खेळणार टी-20 लीग

पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यानच्या कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आता लंका प्रीमियम टी-20 लीगमध्ये खेळणार आहे. बाबर कोलंबो स्ट्राइकर्सच्या संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेला 30 जुलैपासून सुरुवात होत आहे. एकूण संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.