Tokyo Olympics : अदितीने घडवला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय

 आपल्या वडिलांसोबत अदिती या गोल्फ कोर्सवर जायची

Updated: Aug 7, 2021, 11:11 AM IST
 Tokyo Olympics  : अदितीने घडवला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या  अदिती अशोक या खेळाडूनं भारताकडून दमदार खेळी करत या खेळात आपली जादू दाखवून दिली. पण अवघ्या एका शॉटने अदितीचं मेडल हुकलं. आपलं पहिलं-वहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवण्यासाठी  अदितीची धडपड सुरु होती. 

खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि  अदिती तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली. त्यामुळे 72 होल्सच्या खेळानंतर आदितीला अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मात्र, अस जरी असलं, तरी पहिल्या तीन राऊंड्समध्ये आदिती दुसऱ्या स्थानावर कायम होती. 

 अदिती अशोकने खेळात दाखवलेली दमदार कामगिरी पाहून देशभरातून तिचं कौतुक केलं जात आहे. अदितीने देशाचं मन जिंकलं आहे. भारतीय महिला गोल्फपटू अदिती अशोकची अंतिम फेरीत दमदार खेळी दिसून आली.  गोल्फ सारख्या हायप्रोफाईल खेळात भारतीय खेळाडूची ताकद अभिमानास्पद आहे. 

  अदिती अशोकला या खेळाने का केलं आकर्षित ?
 
अदिती अशोक ही भारतीय गोल्फ खेळाडू आहे. अदितीचा जन्म बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे.अदितीचा जन्म 29 मार्च 1998 रोजी झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून गोल्फचे अदितीला आकर्षण होते. कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या हिरव्यागार  गोल्फ कोर्सवर सराव करायची.

आपल्या वडिलांसोबत अदिती या गोल्फ  कोर्सवर जायची , जिथे गोल्फमध्ये ती कुशल झाली. अदिती वडील पंडित गुडलामानी अशोक हेच तिचे कॅडी आहेत.  एकीकडे फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण आणि दुसरीकडे गोल्फ कोर्सवर सराव, अशी दुहेरी कसरत आदिती करत होती. पुढे तिने स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेतला.अदितीने रिओ ऑलिम्पिकमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.