History In Cricket UAE Beat New Zealand: संयुक्त अरब अमिरातीने (UAE) क्रिकेट (UAE Cricket) विश्वात खळबळ उडवली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील दुसरा सामना या तुलनेनं दुबळ्या संघाने 7 विकेट्स राखून पराभूत केलं आहे. शनिवारी (19 ऑगस्ट रोजी) दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिमयवर झालेल्या सामन्यामध्ये यूएईच्या संघाने 143 धावांचं लक्ष तब्बल 26 चेंडू आणि 7 विकेट्स बाकी असतानाच पूर्ण केलं. युएईच्या संघाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडला पराभूत केलं. यामुळे 3 सामन्यांची मालिका 1-1 च्या बरोबरीत आली आहे. मालिका जिंकण्यासाठी आता दोन्ही संघ शेवटच्या सामन्यात आमने-सामने येतील.
यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीमने 29 चेंडूंमध्ये 55 धावांची खेळी केली. यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. तर आसिफ खानने 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या वृत्ति अरविंद (25 धावा), बासिल हमीद (नाबाद 12 धावा) यांच्या योगदानामुळे यूएईला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. न्यूझीलंडकडून कर्णधार टीम साउदी, फिरकी गोलंदाज मिचेल सेंटनर आणि वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. भन्नाट गोलंदाजी करणाऱ्या 17 वर्षीय अयान खानला प्लेअर 'ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. दोन्ही संघांमध्ये तिसरा आणि अंतिम सामना आज म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.
The moment UAE defeated New Zealand and squared the three-match T20I series 1-1
pic.twitter.com/Heygr0Puu9— UAE Cricket Official (@EmiratesCricket) August 19, 2023
नाणेफेक जिंकल्यानंतर यूएईने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच न्यूझीलंडचा संघ चाचपडताना दिसला. अवघ्या 65 धावा फलकावर असताना पाहुण्यांचा अर्धा संघ तंबूत परतला होता. 100 धावांच्या आतच पाहुण्यांचा संघ तंबूत परततो की काय अशी शक्यता व्यक्त केली जात असताना मार्क चॅम्पमन न्यूझीलंडच्या मदतीने धावून आला. त्यामुळेच न्यूझीलंडला 8 बाद 142 पर्यंत मजल मारता आली. चॅम्पमनने 46 चेंडूंमध्ये 63 धावा केल्या. यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
Two in Two!
Aayan Afzal Khan MAGIC at the Dubai International Stadium!!
Santner and Cleaver bowled off consecutive balls - 5th over of the NZ innings. #UAEvNZ pic.twitter.com/kB7zGv75rP— UAE Cricket Official (@EmiratesCricket) August 19, 2023
चॅम्पमनशिवाय चाड बोवेस (21 धावा) आणि जिमी नीशम (21) धावा यांनीही महत्वपूर्ण योगदान दिलं. न्यूझीलंडच्या 5 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. यूएईसाठी फिरकी गोलंदाज अयान अफजल खानने सर्वाधिक म्हणजे 3 विकेट्स घेतल्या. तर जवादुल्लाहने 2 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडचा संघ या मालिकेमध्ये आपल्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळत आहे. केन विलियमसन जायबंदी असल्याने मालिकेत खेळत नाहीयत. तसेच डेवॉन कॉनव्हे, फिन एलन, डेरिल मिचेल आणि ईश सोढीसारखे स्टार क्रिकेटपटूही या मालिकेत नाहीत.