ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियातली वनडे सीरिज रोमांचक अवस्थेत पोहोचली आहे. विराट कोहलीचं शतक आणि धोनीच्या अर्धशतकी खेळीमुळे ऍडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. यामुळे ३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं १-१नं बरोबरी केली आहे. तिसरी आणि निर्णायक वनडे शुक्रवार १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये खेळवण्यात येईल. ऍडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं शेवटपर्यंत लढत देत भारताला विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून धोनीनं भारताला ४ बॉल आणि ६ विकेट राखून जिंकवून दिलं. पण मैदानात नेहमीच शांत असलेल्या धोनीचा तोल या मॅचमध्ये ढळल्याचं पाहायला मिळालं.
मॅचमध्ये कितीही तणाव असला तरी धोनी नेहमीच मैदानात शांत असतो. धोनी त्याचे भाव मैदानात कधीच व्यक्त होऊ देत नाही. पण दुसऱ्या वनडेवेळी बॅटिंग करत असताना शेवटच्या काही ओव्हरमध्ये धोनी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. मैदानात ड्रिंक्स घेऊन आलेल्या खलील अहमदकडे बघून धोनीनं अपशब्द उच्चारल्याचं बोललं जातंय. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ड्रिंक्स ब्रेक झालेला असताना खलील अहमद ड्रिंक्स घेऊन तर युझवेंद्र चहल धोनीसाठी हेल्मेट घेऊन मैदानात आले. दिनेश कार्तिकला ड्रिंक्स देण्यासाठी खलील क्रिज पार करून जात होता, तेव्हा धोनी नाराज झाला आणि त्यानं खलीलला क्रिजपासून लांब जायचा इशारा केला. या व्हिडिओमध्ये धोनी काय बोलला ते ऐकू येत नसलं तरी त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो खलीलला अपशब्द वापरत असल्याचं काही यूजर्सचं म्हणणं आहे.
Msd said to khaleel 'chu**ya' pic.twitter.com/36ciPlogzb
— Prem Chopra (@premchoprafan) January 15, 2019
या मॅचमध्ये धोनीनं ५४ बॉलमध्ये ५५ रनची खेळी केली. यामध्ये २ सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहलीनं त्याचं वनडे क्रिकेटमधलं ३९वं शतक झळकावलं. ११२ बॉलमध्ये १०४ रन करून विराट आऊट झाला. ४४व्या ओव्हरला विराट आऊट झाल्यानंतर धोनी आणि कार्तिकनं भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकनंही १४ बॉलमध्ये २५ रन करून भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं.