मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. भारताने ठेवलेल्या २५६ रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्धचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. या मॅचदरम्यान नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC)विरोधात निदर्शनं करण्यात आली.
वानखेडे स्टेडियमवर काही प्रेक्षकांनी 'NO CAA' आणि 'NO NRC' लिहिलेले टी-शर्ट घातले होते. या प्रेक्षकांनी 'NO CAA' आणि 'NO NRC'च्या घोषणाही दिल्या. टाटा सामाजिक संस्था (TISS), मुंबई विद्यापीठ आणि आयआयटीतील काही विद्यार्थ्यांनी हे टी-शर्ट घातले होते. वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर २० व्या षटकाचा खेळ होईपर्यंत विद्यार्थी शांत बसले. पण नंतर त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. निदर्शनं करणाऱ्यांना पांगवण्यासाठी आणि वेगळं करण्यासाठी सुरक्षा रक्षकही पोहोचले.
टी-शर्ट घालून निदर्शनं करणाऱ्यांना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही जणांनी घोषणा देऊन प्रत्युत्तर दिलं. आजूबाजूला उभ्या असलेल्या या प्रेक्षकांनी मोदी-मोदी आणि भारत माता की जय या घोषणा द्यायला सुरुवात केली.
A group in Wankhede stadium was shouting ‘No CAA, no NRC’
All the people around started chanting ‘Modi Modi’
— desi mojito (@desimojito) January 14, 2020
ऑस्ट्रेलियाने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताचा ४९.१ ओव्हरमध्ये २५५ रनवर ऑल आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने नाबाद १२८ रन आणि एरॉन फिंचने नाबाद ११० रन केले. ३७.४ ओव्हरमध्येच ऑस्ट्रेलियाने हे आव्हान पूर्ण केलं.
भारत आणि ऑस्ट्रेलियाची दुसरी मॅच आता शुक्रवारी राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. सीरिज वाचवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरी मॅच जिंकली तर त्यांना २-०ची विजयी आघाडी मिळेल. मागच्यावर्षी भारतात झालेल्या वनडे सीरिजमध्येही ऑस्ट्रेलियाचा ३-२ने विजय झाला होता. पहिल्या २ मॅच गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उरलेल्या तिन्ही मॅचमध्ये विजय मिळवला होता.