मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. भारताने ठेवलेल्या २५६ रनच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता केला. वॉर्नरने नाबाद १२८ आणि एरॉन फिंचने नाबाद ११० रन केले. ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्धचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. वॉर्नरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मॅचमध्ये भारतीय टीम नव्या रणनितीसह उतरली होती. रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल या तिन्ही ओपनरला टीमने संधी दिली. त्यामुळे विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं लागलं. अनेक समिक्षक आणि क्रिकेट रसिकांना हा निर्णय पसंत पडला नाही. मॅचनंतर संजय मांजरेकर यांनीही विराटला याबाबत प्रश्न विचारला.
'शिखर धवन आणि केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. रोहितनेही टीममध्ये पुनरागमन केलं आहे. त्यामुळे आम्ही तिघांना खेळवण्याचा निर्णय घेतला, म्हणून मी चौथ्या क्रमांकावर खेळायला आलो. जास्त तणाव घ्यायची गरज नाही, हा फक्त एक प्रयोग होता, जो यशस्वी झाला नाही. हा कायमचा निर्णय नाही. मला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळलं पाहिजे का? याबाबत पुन्हा विचार करता येईल. जे खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहेत, त्यांना योग्य संधी दिली पाहिजे', असं विराटने सांगितलं.
कोहलीला या मॅचमध्ये १६ रनच करता आले. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या राहुलने ४७ रन आणि ओपनर शिखर धवनने ७४ रन केले. रोहित शर्मा १० रन करुन आऊट झाला.