कोलंबो : निदहास ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव करत जेतेपद मिळवले. या स्पर्धेत सामन्यांपेक्षा चर्चा रंगली ती नागिण डान्सची.
सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला हरवल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानात नागिण डान्स करत जल्लोष व्यक्त केला. त्यांचा हा नागिण डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
फायनलमध्ये भारताने बांगलादेशला हरवले. अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार लगावला आणि भारताने सामना जिंकला. यावेळी मैदानात श्रीलंकेचे चाहतेही उपस्थित होते. त्यांचा पाठिंबा साहजिकच भारताला होता.
दिनेश कार्तिकने जसा षटकार लगावला तसा स्टेडियममधील श्रीलंकेच्या चाहत्याने जबरदस्त नागिण डान्स करत जल्लोष व्यक्त केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
कार्तिकने ८ चेंडूत २९ धावा तडकावल्या. बांगलादेशने पहिल्यांदा गोलंदाजी करताना १६६ धावा केल्या होत्या. भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान चार विकेट राखत पूर्ण केले.