मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवार वेस्टइंडीजच्या विरोधात तिसऱ्या आणि फायनल सामन्यात २९ बॉलमध्ये ७० रन ठोकले. विराटच्या या विस्फोटक खेळीमध्ये त्याने ७ सिक्स आणि ४ फोर मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा २४१.३८ होता. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात कोहलीची खेळी पाहून प्रत्येक जण हैराण झाला. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे सामन्याची दिशाच बदलली. चौथ्या नंबरवर आलेल्या विराटला रोखणं इंडिजच्या बॉलर्सला अशक्य झालं होतं. विराट कोहलीच्या या खेळीमुळे भारताचा स्कोर २४० रनपर्यंत पोहोचला.
भारताने ठेवलेल्या २४१ रनच्या आव्हानापुढे इंडिजची टीम पराभूत झाली. पण विराट कोहलीने सामन्यासह अनुष्काचं मनही जिंकलं. विराटने अनोख्या प्रकारे अनुष्काला लग्नाच्या वाढदिवशी हे गिफ्ट दिलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी बुधवारी ११ डिसेंबरला लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी विराटने धडाकेबाज खेळी करत हा दिवस आणखी सुंदर बनवला.
विराट आणि अनुष्का ११ डिसेंबर २०१७ ला विवाहबंधनात अडकले होते. इटलीच्या टस्कनी मध्ये त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा होती. विरुष्काच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या सामन्यात लोकेश राहुलने ९१, रोहित शर्माने ७१ तर विराट कोहलीने नाबाद ७० रनचं योगदान दिलं. टीम इंडियाने ३ विकेट गमवत २० ओव्हरमध्ये २४० रन केले.
विंडिजचा कर्णधार पोलार्डने आधी टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय़ घेतला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला रोहित शर्माने आपल्या होम ग्राऊंडमध्ये जबरदस्त खेळी केली. त्याला केएला राहुलने ही चांगली साथ दिली. पहिल्या ६ ओव्हरमध्ये दोघांनी ७२ रन केले. आठव्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोर १०० रनवर पोहोचला. रोहित आणि राहुलने १३५ रनची पार्टनरशिप केली.