मुंबई : भारतीय क्रिकेट टीमला इंग्लंड दौऱ्यावर एकमेव टेस्ट सामना खेळायचा आहे, मात्र त्याआधी विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. शेवटच्या निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी हा मोठा झटका ठरू शकतो. इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 5 जुलैपर्यंत खेळवली जाणार आहे.
पण, विराट कोहलीच्या कोरोना रिपोर्टने चाहत्यांची चिंता वाढवलीये. मालदीवमधून परतल्यानंतरच विराट कोहलीला कोरोना झाला असल्याचं आता समोर येतंय. मुळात, असं असूनही तो इतर खेळाडूंसोबत इंग्लंड दौऱ्यावर पोहोचला आणि बीसीसीआयनेही ही बातमी उघड होऊ दिली नाही. यामुळे मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार, "विराट कोहलीला मालदीवमधून परतल्यावरच कोरोनाची लागण झाली होती. तो लंडनला रवाना पोहोचल्यानंतर याची खात्री झाली. मात्र आता तो कोरोनातून बरा झाला आहे आणि खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे."
दरम्यान ही बाब समोर आल्यानंतर विराट कोहलीवर आता प्रश्नांचा भडीमार सुरु झाला आहे. कोरोनामधून बरं झाल्यानंतरही तो मास्कशिवाय लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसला आणि चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाही त्याचे फोटो व्हायरल झालेत.
अहवालांवर विश्वास ठेवला तर, इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं होतं. त्यामुळेच त्याने सहकारी खेळाडूंसोबत जाण्यास नकार दिला.