न्यूझीलंडला व्हाईट वॉश करण्याची टीम इंडियाला संधी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली ५वी आणि अखेरची टी-२० मॅच रविवारी होणार आहे.

Updated: Feb 1, 2020, 09:17 PM IST
न्यूझीलंडला व्हाईट वॉश करण्याची टीम इंडियाला संधी title=

माऊंट मंगनुई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली ५वी आणि अखेरची टी-२० मॅच रविवारी होणार आहे. या सीरिजमध्ये आधीच ४-०ने आघाडीवर असलेली भारतीय टीम न्यूझीलंडला व्हाईट वॉश करण्यासाठी मैदानात उतरेल. याआधी क्रिकेट इतिहासात ५ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये कोणत्याच टीमला ५-०ने विजय मिळवता आलेला नाही, त्यामुळे हा विक्रम करण्याची संधी विराटला आहे. न्यूझीलंडमध्ये टी-२० सीरिज जिंकणारा विराट हा पहिलाच भारतीय कर्णधार बनला आहे. 

पहिल्या टी-२० मध्ये भारताचा ६ विकेटने आणि दुसऱ्या टी-२०मध्ये ७ विकेटने सहज विजय झाला. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० मॅच टाय झाल्या. अखेर सुपर ओव्हरमध्ये भारताने रोमांचक विजय मिळवला. आता पाचवी टी-२० मॅच माऊंट मंगनुईमध्ये खेळवण्यात येणार आहे. याठिकाणी दोन्ही टीम पहिल्यांदाच टी-२० मॅच खेळणार आहेत. 

सीरिज जिंकल्यानंतर विराटने बाकीच्या खेळाडूंना संधी देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताने रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला आराम दिला. या खेळाडूंच्याऐवजी संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती. 

या सीरिजमध्ये अजूनही ऋषभ पंत आणि कुलदीप यादवला संधी मिळालेली नाही, त्यामुळे पाचव्या टी-२०मध्ये विराट या दोघांना खेळवणार का? या दोघांना खेळवायचं असेल तर विश्रांती कोणाला मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे चौथ्या टी-२० मॅचमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनच्या अनुपस्थितीत कॉलिन मुन्रो आणि टीम सायफर्टने चांगली कामगिरी केली. तर टीम साऊदीचा फॉर्म न्यूझीलंडसाठी चिंतेचा विषय आहे. पाचव्या टी-२० साठी फिट होऊन न्यूझीलंडचा ५-०ने पराभव टाळण्याचं आव्हान केन विलियमसन पुढे असणार आहे. 

भारतीय टीम 

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, शिवम दुबे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर