विराटचा विक्रम, धोनी जवळपासही नाही

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला.

Updated: Jan 20, 2020, 08:31 PM IST
विराटचा विक्रम, धोनी जवळपासही नाही

बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. या विजयाबरोबरच भारताने ३ वनडे मॅचची सीरिज २-१ने जिंकली. ऑस्ट्रेलियाला २८६ रनवर रोखल्यानंतर रोहित शर्माचं शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारताने ही मॅच ७ विकेटने जिंकली. कर्णधार म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ५ हजार रन पूर्ण करण्याचा विक्रमही विराटने या खेळीमध्ये केला.

तिसऱ्या वनडेमध्ये विराटला हा विक्रम करण्यासाठी फक्त ४ रनची गरज होती. कोहलीने कर्णधार म्हणून फक्त ८२ वनडेमध्येच ५ हजार रनचा टप्पा ओलांडला. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला हे रेकॉर्ड करण्यासाठी १२७ इनिंग लागल्या होत्या.

सगळ्यात जलद ५ हजार रन पूर्ण करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने १३१ इनिंगमध्ये ५ हजार रन केले, तर दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथला हा विक्रम करण्यासाठी १३५ इनिंग लागल्या. सौरव गांगुलीने १३६ इनिंगमध्ये ५ हजार रन केले होते. 

विराटसोबतच रोहित शर्मानेही या मॅचमध्ये रेकॉर्ड केली. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २९वं शतक होतं. याचसोबत रोहितने सनथ जयसूर्याच्या २८ शतकांचं रेकॉर्ड मोडलं. रोहित शर्माच्या पुढे आता ४ खेळाडू आहेत. वनडे क्रिकेटमध्ये रिकी पाँटिंगच्या नावावर ३० शतकं, विराटच्या नावावर ४३ आणि सचिनच्या नावावर ४९ शतकं आहेत.

या मॅचमध्ये रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये ९ हजार रनचा टप्पा ओलांडला. रोहितने २२४व्या वनडेमध्ये ९ हजार रन पूर्ण केले. सगळ्यात जलद ९ हजार रन पूर्ण करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित तिसरा ठरला.