ड्रेसिंग रूमची पवित्रता पाळली पाहिजे, अखेर विराट बोलला

अनिल कुंबळेनं भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताना कॅप्टन विराट कोहलीवर गंभीर आरोप केले होते.

Updated: Jun 22, 2017, 09:25 PM IST
ड्रेसिंग रूमची पवित्रता पाळली पाहिजे, अखेर विराट बोलला title=

पोर्ट ऑफ स्पेन : अनिल कुंबळेनं भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताना कॅप्टन विराट कोहलीवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर विराट कोहलीनं अखेर मौन सोडलं आहे. अनिल कुंबळेच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल, त्यानं देशासाठी जे काही केलं त्याबद्दल मला आदर आहे, तसंच त्याच्या मताचाही मी आदर करतो, असं विराट कोहली म्हणाला आहे.

ड्रेसिंग रूमची पवित्रता पाळली गेली पाहिजे. ड्रेसिंग रूममध्ये होणाऱ्या गोष्टी या खासगी असतात असं विराट कोहली म्हणाला आहे. त्याआधी विराट कोहलीनं अनिल कुंबळेबद्दलचे जुने ट्विट डिलीट केले होते.

मागच्या वर्षी अनिल कुंबळेची प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर त्याचं स्वागत करणारं ट्विट कोहलीनं केलं होतं. २३ जून २०१६ साली विराटनं हे ट्विट केलं होतं. प्रशिक्षक झाल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. तुमच्याबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. भारतीय क्रिकेट तुमच्याबरोबर उत्तुंग कामगिरी करेल असं ट्विट कोहलीनं केलं होतं.

काय म्हणाला होता कुंबळे?

मी पुन्हा प्रशिक्षक व्हावं म्हणून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि लक्ष्मण यांच्या समितीनं मला सांगितलं. पण कॅप्टनला माझ्या कार्यपद्धतीबद्दल आणि प्रशिक्षक म्हणून कायम राहण्याबद्दल आक्षेप आहेत, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं, म्हणून मी राजीनामा दिला आहे, असं प्रसिद्धी पत्रक कुंबळेनं ट्विटरवर शेअर केलं होतं.

कॅप्टननं घेतलेल्या या भूमिकेमुळे मला आश्चर्य वाटलं कारण कॅप्टन आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेतल्या मर्यादेचा मी नेहमीच आदर केला आहे. बीसीसीआयकडून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तरीही मी राजीनामा दिल्याचा निर्णय घेतल्याचं कुंबळे म्हणाला होता.