रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि २०२ रननी विजय झाला. याचबरोबर भारताने ३ टेस्ट मॅचची सीरिज ३-०ने जिंकून दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारताने दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश केलं आहे. याआधी विशाखापट्टणम आणि पुण्यात झालेल्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला होता.
भारताने दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश जरी केलं असलं तरी कर्णधार विराट कोहली मात्र नाराज आहे. छोट्या शहरांमध्ये टेस्ट मॅच खेळण्याबाबत विराटने नाराजी व्यक्त केली आहे. 'आपल्याला ५ मजबूत टेस्ट केंद्र बनवली पाहिजेत, असं मला वाटतं. ज्या परदेशी टीम टेस्ट मॅच खेळण्यासाठी भारतात येतात, त्यांना या ५ केंद्रांबाबत माहिती पाहिजे. या मैदानांमधल्या खेळपट्ट्या चांगल्या असाव्यात आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकही यावेत. भारतातली टेस्ट केंद्र एवढ्या लांब असणं योग्य नाही,' असं विराट म्हणाला.
'रोटेशनची मागणी करणाऱ्या राज्य संघटनांशी मी सहमत आहे. पण त्यांना वनडे आणि टी-२० मॅचचं आयोजन करून द्यायला पाहिजे. टेस्ट क्रिकेट थोडं वेगळं आहे. टेस्ट मॅच कोणत्या ५ मैदानांवर होणार, हे भारतीय टीमला माहिती पाहिजे,' असं वक्तव्य विराटने केलं.
रांचीच्या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३९ हजार एवढी आहे, पण मॅच सुरु व्हायच्या आधी फक्त १५०० तिकिटं विकली गेली होती. मॅच पाहण्यासाठीही स्टेडियममध्ये कमी प्रेक्षक होते.