रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा इनिंग आणि २०२ रननी दणदणीत विजय झाला आहे. याचबरोबर भारताने ३ टेस्ट मॅचची सीरिज ३-०ने जिंकली आहे. या विजयाबरोबरच भारताने विक्रमांचा पाऊस पाडला आहे. भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश केलं आहे. तसंच विराट कोहली हा दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश करणारा पहिला कर्णधार बनला आहे.
टीम इंडियाने घरच्या मैदानात लागोपाठ ११ सीरिजमध्ये विजय मिळवला आहे. याचसोबत भारताने ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानातल्या लागोपाठ १० सीरिज विजयाचा विक्रम मोडित काढला आहे. २०१२ सालानंतर टीम इंडिया घरच्या मैदानात टेस्ट सीरिज हरलेली नाही. ऑस्ट्रेलियाने रिकी पॉण्टिंगच्या नेतृत्वात घरच्या मैदानात लागोपाठ १० टेस्ट सीरिज जिंकल्या होत्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताने आतापर्यंत सगळ्या मॅच जिंकल्या आहेत. ५ टेस्ट मॅचमध्ये ५ विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाचे आता २४० पॉईंट्स आहेत. पॉईंट्स आणि विजयाच्या बाबतीत कोणतीच टीम भारताच्या जवळपासही नाही. ६० पॉईंट्ससह न्यूझीलंडची टीम पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचे ६०, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे प्रत्येकी ५६-५६ पॉईंट्स आहेत. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेला अजून त्यांचं खातंही उघडता आलं नाही. तर पाकिस्तान आणि बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची एकही मॅच खेळलेली नाही.
२०१९ मध्ये सर्वाधिक टेस्ट मॅच जिंकण्याचा विक्रम भारताने केला आहे. यावर्षी भारताने एकूण ६ टेस्ट मॅच खेळल्या, यातल्या ५ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. वर्षाच्या सुरुवातीला भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली टेस्ट मॅच ड्रॉ झाली. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ टेस्ट मॅचमध्ये भारताचा विजय झाला. म्हणजेच या वर्षात भारताने एकही टेस्ट मॅच गमावलेली नाही.