ऋषभ पंतला स्लेज करणाऱ्या ब्रॉडला विराटचं मैदानातच प्रत्युत्तर

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी शानदार विजय झाला.

Updated: Aug 27, 2018, 07:00 PM IST
ऋषभ पंतला स्लेज करणाऱ्या ब्रॉडला विराटचं मैदानातच प्रत्युत्तर title=

नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी शानदार विजय झाला. या मॅचमधून विकेट कीपर ऋषभ पंत यानं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या ऋषभ पंतनं उत्कृष्ट कामगिरी केली. टेस्ट क्रिकेटमधली पहिली रन पंतनं सिक्स मारून केली. तर या मॅचमध्ये तब्बल ७ कॅच पकडण्याचा रेकॉर्डही पंतनं नावावर केला. या मॅचमध्ये ऋषभ पंतला इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडनं स्लेज केलं. पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंत २४ रनवर आऊट झाल्यानंतर ब्रॉड पंतकडे बघून काहीतरी बोलला.

ब्रॉडनं पंतला केलेल्या स्लेजिंगचा बदला मात्र विराट कोहलीनं मैदानातच घेतला. दुसऱ्या इनिंगमध्ये ब्रॉड बॅटिंग करायला आला तेव्हा विराट कोहली भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला आणखी जलद बॉलिंग टाकण्यासाठी प्रोत्साहन देत होता. यानंतर ब्रॉडनंही हे खूप आक्रमक असल्याची प्रतिक्रिया दिली. मग तरुण मुलाला लक्ष्य केलं तर त्याचं उत्तर असंच मिळेल, असं सडेतोड प्रत्युत्तर विराटनं स्टुअर्ट ब्रॉडला दिलं.