विराटला ब्रॅडमनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारतानं तिसऱ्या टेस्टमध्ये शानदार पुनरागमन केलं.

Updated: Aug 27, 2018, 05:23 PM IST
विराटला ब्रॅडमनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी  title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारतानं तिसऱ्या टेस्टमध्ये शानदार पुनरागमन केलं. तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतीय टीम १-२नं पिछाडीवर आहे. ३० ऑगस्टपासून चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला चौथी टेस्ट मॅच ड्रॉ करणं किंवा जिंकणं आवश्यक आहे. साऊथॅम्पटनमध्ये होणारी ही टेस्ट भारत जिंकला तर सीरिज जिंकण्याचीही संधी आहे. पाचवी टेस्ट मॅच ७ सप्टेंबरपासून लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात येणार आहे.

चौथी आणि पाचवी टेस्ट भारतानं जिंकली तर ऑस्ट्रेलियानं १९३६-३७ साली केलेल्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. टेस्ट इतिहासात फक्त एकदाच ०-२नं पिछाडीवर असलेली टीम सीरिज जिंकली आहे. १९३६-३७ साली सर डॉन ब्रॅडमन कर्णधार असलेल्या ऑस्ट्रेलियानं इंग्लंडविरुद्ध हा विक्रम केला होता. त्यावेळी इंग्लंडनं ब्रिस्बेन आणि सिडनीमध्ये झालेल्या दोन टेस्ट जिंकल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियानं उरलेल्या तिन्ही मॅच जिंकत सीरिज खिशात घातली.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननं पराभव झाला. यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला इनिंग आणि १५९ रननी पराभवाचा धक्का बसला. तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं २०३ रननी विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीनं पहिल्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये शतक झळकावलं. विराट कोहली या सीरिजमधला सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे.