मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्मशी झुंज देताना दिसतोय. त्यामुळेच तो विरोधकांच्या निशाण्यावर राहतो. नजीकच्या काळात त्याने एकंही मोठी खेळी खेळलेली नाही, असं समीक्षकांचं मत आहे. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली दिसत असल्याच्या चर्चा आहेत.
नुकतेच किंग कोहलीने मनमोकळेपणाने चाहत्यांसमोर मानसिक आरोग्याबाबत त्याचं मत मांडलं होतं. तेव्हापासून तो लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. कोहलीच्या या वक्तव्याबाबत विविध बातम्या समोर आल्या. ज्यामध्ये नैराश्यासारखे शब्द वापरले गेले. आता विराट कोहलीचा मॅनेजर बंटी सजदेहने यावर मोठी प्रतिक्रिया दिलीये.
विराटचा मॅनेजर बोलताना म्हणाला, डिप्रेशनसारखी गंभीर स्थिती विराटला समजली आहे. मानसिक आव्हानांवर तो मोकळेपणाने बोलला आणि ते स्वीकारण्यास तो मागे हटत नाही. त्याने आपल्या कारकिर्दीच्या एका विशिष्ट टप्प्यावरच मानसिक आव्हानं अनुभवली आहेत. विराटला कधीही एकटं वाटणार नाही.
तो पुढे म्हणाला, जेव्हा विराट त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या लोकांच्या आसपास असतो, तेव्हा त्याला मानसिक बळ मिळते. डिप्रेशन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा शब्द आहे. जे विराटसाठी इतक्या सहजतेने वापरता येणार नाही.