कॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड

भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 21, 2018, 06:17 PM IST
कॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड title=

सेंच्युरिअन : भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते. रन मशीन या नावानं ओळख बनवलेल्या विराटनं अनेक रेकॉर्ड तोडली आहेत. तसंच अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली आहेत. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला आता सर डॉन ब्रॅडमन यांचं रेकॉर्ड खुणावत आहे.

कोहलीचा रन्सचा डोंगर

कॅप्टन विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेच्या या दौऱ्यामध्ये खोऱ्यानं रन्स केल्या आहेत. टेस्ट सीरिजमध्ये कोहलीनं ४७.६६ च्या सरासरीनं २८६ रन्स केल्या. तर ६ वनडेच्या सीरिजमध्ये कोहलीनं ५५८ रन्स बनवल्या. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. कोणत्याही दोन टीमच्या सीरिजमध्ये एवढी शतकं लगावलेला विराट हा एकमेव बॅट्समन आहे.

टी-20 सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये कोहलीनं २० बॉल्समध्ये २६ रन्स बनवले. आता कोहलीकडे आणखी दोन इनिंग आहेत. या दोन इनिंगमध्ये कोहलीनं १०४ रन्स केल्या तर कोहली डॉन ब्रॅडमन यांचं रेकॉर्ड मोडेलं तसंच त्याला विवियन रिचर्ड्स यांच्या क्लबमध्ये पोहोचायची संधीही कोहलीकडे आहे. 

तर विराट जाणारा ब्रॅडमन यांच्या पुढे 

विराट कोहलीनं आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात १० मॅचच्या १३ इनिंगमध्ये ८७.००ची सरासरी आणि ८२.३८च्या स्ट्राईक रेटनं ८७० रन्स केल्या आहेत. यामध्ये चार शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. उरलेल्या २ टी-20मध्ये कोहलीनं १०४ रन्स केल्या तर विराट ब्रॅडमन यांचं रेकॉर्ड मोडेल. ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्टमध्ये ९७४ रन्स केल्या होत्या. 

कोहली विवियन रिचर्ड्स यांच्या क्लबमध्ये? 

याचबरोबर विराट एका दौऱ्यामध्ये १ हजार रन्स पूर्ण करण्यापासून १३० रन्स लांब आहे. उरलेल्या टी-20मध्ये विराटनं या रन्स केल्या तर आंतरराष्ट्रीय दौऱ्यामध्ये एक हजार रन्स करणारा विराट दुसरा खेळाडू बनेल. वेस्ट इंडिजच्या सर विवियन रिचर्ड्स यांनी १९७६च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये १०४५ रन्स केल्या होत्या. रिचर्ड्स यांनी चार टेस्टमध्ये ८२९ रन्स आणि तीन वनडेमध्ये २१६ रन्स केल्या होत्या.