Virat Kohli Opening In Asia Cup 2022: ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. तत्पूर्वी टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंची कामगिरी कशी होते? याकडे निवड समितीचं लक्ष लागून असणार आहे. खासकरून विराट कोहलीच्या कामगिरीकडे नजर असणार आहे. कारण गेल्या काही स्पर्धांमध्ये विराट कोहली आऊट ऑफ फॉर्म आहे. या स्पर्धेतील कामगिरीवर वर्ल्डकप संघात त्याला स्थान मिळणार की नाही? ठरणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली वन डाऊन येणार की ओपनिंगला याबाबत चर्चा रंगली आहे. माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे. दुसरीकडे या स्पर्धेत विराट चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.
पार्थिव पटेलने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "विराटची फलंदाजी अतिशय महत्त्वाची ठरते. त्याने ओपनिंग करणे योग्य ठरेल कारण त्याने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी सलामीला सर्वोत्तम खेळी केली आहे." दुसरीकडे क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही आपलं मत मांडलं आहे. "विराट चेंडूला चांगला मारतोय की नाही हे संघ व्यवस्थापन बघेल, कारण त्याने सहज चेंडू मारायला सुरुवात केली तर धावा होतील. ", असं हर्षा भोगले यांनी सांगितलं.
अलीकडच्या काळात टीम इंडियाने इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव या खेळाडूंना डावाची सुरुवात करण्याची संधी दिली आहे. रोहित शर्मा सलामीला उतरणार जवळपास निश्चित आहे. मात्र आशिया चषकात त्याच्यासोबत सलामीला कोण हे पाहणं महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सलामीवीर म्हणून आठ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 39.71 च्या सरासरीने एकूण 278 धावा केल्या आहेत. 2021 मध्ये त्याने सलामी करताना नाबाद 80 धावांची खेळीही खेळली होती.