'विराटला आराम देऊन याला कॅप्टन बनवा'

विराट कोहलीला निवड समितीनं आराम द्यावा, असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं दिला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 25, 2017, 07:14 PM IST
'विराटला आराम देऊन याला कॅप्टन बनवा' title=

मुंबई : विराट कोहलीला निवड समितीनं आराम द्यावा, असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं दिला आहे. विराटला आराम देऊन रोहित शर्माला भारताचा कॅप्टन बनवण्यात यावं, अशी मागणीही सेहवागनं केली आहे. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाबाबत विराट कोहलीनं केलेल्या वक्तव्यानंतर सेहवागनं ही प्रतिक्रिया दिली आहे.

'धोनीलाही आराम दिला होता'

श्रीलंका सीरिजपासून विराटला लगेचच आराम दिला पाहिजे. विराटला विश्रांतीची गरज आहे. तसंच विराटला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी देण्यात यावी, असं मत सेहवागनं व्यक्त केलं आहे. धोनी कॅप्टन असताना त्यालाही आराम देण्यात आला होता. धोनीला आराम दिल्यावर निवड समितीनं गौतम गंभीरला कॅप्टन केलं होतं. गंभीरच्या नेतृत्वातही भारतानं एकही मॅच हारली नाही. त्यामुळे विराटला आराम देऊन रोहितला कॅप्टन करावं, असं सेहवाग म्हणाला.

काय म्हणाला होता विराट?

कोणत्याही मालिकेच्या तयारीसाठी किमान एका महिन्याचा वेळ मिळायला हवा. मात्र, तो मिळत नाही. नाईलाजानं आम्हाला मिळेल त्या वेळात तयारी करावी लागते. या साऱ्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतोय,  अशी खंत व्यक्त त्याने केली.

दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याआधी आमच्या हातात केवळ दोन दिवस आहेत. आमच्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. या दोन दिवसांत आम्हाला सर्व तयारी करावी लागणार आहे. सध्या श्रीलंका मालिका सुरु आहे. आणि स्वत:ला फिटही ठेवावं लागणार आहे, असे विराटने बोलून दाखवले.

क्रिकेट खेळाचे वेळापत्रक व्यस्त आहे. कोणताही परदेश दौरा असला तर अन्य संघ तयारीसाठी खूप वेळ घेतात. याउलट टीम इंडियाची स्थिती आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर बोलेल जाते. वेळप्रसंगी  टीकाही केली जाते. मात्र, वेळ नसेल तर खेळाडू तरी काय करणार, असे थेट सवाल विराटने यावेळी उपस्थित केला.

विराटच्या टीकेला बीसीसीआयचं प्रत्युत्तर

विराट कोहलीचं हे मत गंभीरतेनं घेण्याची गरज असल्याचं वक्तव्य बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी केलं आहे.

विराट भारतीय टीमचा कॅप्टन आहे आणि क्रिकेटबाबत विराटनं केलेल्या वक्तव्यांचा गंभीरतेनं पाहिलं पाहिजे. खेळाडू थकत असतील तर त्याचाही विचार व्हावा, असं खन्ना म्हणाले. भविष्यात घरच्या मैदानात होणाऱ्या सीरजच्या नियोजनावर लक्ष दिलं जाईल, अशी ग्वाही खन्ना यांनी दिली.

खेळाडूंना विश्रांती न देता लागोपाठ तीन सीरिजटचं आयोजन करणं कितपत योग्य आहे, याबाबत योग्य ठिकाणी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. या मुद्द्यावर ९ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा झाली तर चांगलं होईल, असं खन्ना म्हणाले.

२०१७मध्ये विराट खेळला सर्वाधिक मॅच

आयपीएल सुरु झाल्यानंतर भारतीय टीम बिना ब्रेक क्रिकेट खेळत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, वेस्ट इंडिज, श्रीलंका दौरा आणि त्यानंतर घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध लागोपाठ ३ सीरिजमध्ये २३ मॅच भारतानं खेळल्या आहे. २०१७मध्ये विराट कोहली सर्वाधिक मॅच खेळला आहे. कोहलीनं या वर्षी ४४ आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, यामध्ये ८ टेस्टचा समावेश आहे. हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनीनं यावर्षी ३६, भुवनेश्वर कुमारनं ३१ आणि शिखर धवननं २९ आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या.