मुंबई : विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. त्याला ब्रेक दिला जावा अशी मागणी केली जात असताना आता एक मोठी बातमी येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात कोहलीला आराम दिला जाऊ शकतो. तर त्याच्या जागी टीम इंडियामध्ये कोणाला संधी मिळणार हे जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरिजमध्ये विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्याची शक्यता आहे. तर कोहलीच्या जागी स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर उतरण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये 8 सामन्यांमध्ये 248 धावा केल्या. त्याच्याकडे कोलकाताचं कर्णधारपदही आहे. कोहलीची जाग घेण्यासाठी तो सर्वात मोठा दावेदार असल्याचं सांगितलं जातं.
श्रेयस अय्यरला विराट कोहलीच्या जागी श्रीलंका सीरिजमध्ये संधी देण्यात आली होती. या सीरिजमध्ये तिसऱ्या क्रमांकावर उतरत 204 धावा श्रेयस अय्यरने केल्या होत्या. तीन अर्धशतक ठोकले होते. त्याला मॅन ऑफ द मॅच देखील देण्यात आलं होतं. त्यामुळे कोहलीचं टीममधील तिसरं स्थान धोक्यात येऊ शकतं अशी चर्चाही त्यावेळी झाली होती.
श्रेयस अय्यर तिन्ही फॉरमॅटसाठी खेळला आहे. आपल्या फलंदाजीने त्याने गेल्या काही सामन्यात टीम इंडियामध्ये आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. श्रेयस अय्यरने 4 कसोटी, 26 वन डे आणि 36 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटी आणि वन डेमध्ये प्रत्येकी एक शतक श्रेयसच्या नावावर आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या तयारीसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. ही सीरिज 9 जून ते 19 जून दरम्यान होणार असल्याची माहिती मिळाली आहे.