वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

वसीम जाफरचा विक्रम, सचिन-विराटलाही जमला नाही

Updated: Feb 4, 2020, 05:40 PM IST
वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय title=

नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पण मंगळवारी वसीम जाफरने असा विक्रम केला आहे जो सचिन, कोहली आणि धोनीसारख्या भारताच्या दिग्गज खेळाडूंनाही जमला नाही. रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये वसीम जाफरने १२ हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. रणजी क्रिकेटमध्ये १२ हजार रन पूर्ण करणारा जाफर हा पहिला खेळाडू ठरला आहे.

वसीम जाफरने विदर्भाकडून खेळताना केरळविरुद्धच्या मॅचमध्ये हा विक्रम केला. रणजी ट्रॉफीच्या या मोसमाआधी जाफरने ११,७७५ रन केले होते. त्याआधी या मोसमात वसीम जाफरने १५०वी मॅच खेळत इतिहास घडवला होता. रणजी ट्रॉफीमध्ये एवढ्या मॅच खेळणारा जाफर हा एकमेव खेळाडू आहे. १५० मॅचमध्ये सर्वाधिक ४० शतकं करण्याचा विक्रमही जाफरच्या नावावर आहे.

४१व्या वर्षीही वसीम जाफर त्याच उत्साहाने क्रिकेट खेळत आहे. अजूनही मी निवृत्तीबाबत विचार केला नसल्याचं जाफर याने सांगितलं आहे. वसीम जाफरला आयपीएलमध्ये पंजाब टीमचा बॅटिंग सल्लागार करण्यात आलं आहे. बांगलादेशच्या टीमसोबतही जाफरने बॅटिंग सल्लागाराची भूमिका निभावली होती.

वसीम जाफरने १९६-९७च्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये जाफरचं रेकॉर्ड शानदार आहे. भारताकडून वसीम जाफरने ३१ टेस्ट आणि २ वनडे मॅच खेळल्या. जाफरने टेस्ट क्रिकेटमध्ये ३४.१० च्या सरासरीने १,९४४ रन केल्या, यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. वनडेमध्ये जाफरला फक्त १० रन करता आल्या. २००८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जाफर शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला.