Rishabh Pant: बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातची टीम अवघ्या 89 रन्सवर ऑलआऊट झाली. यानंतर दिल्लीच्या टीमने 8.9 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पार करत सामना जिंकला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने 11 बॉल्समध्ये नाबाद 16 रन्स केले. ज्यामध्ये एक फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. असं असूनही पंतला प्लेयर ऑफ मॅच अवॉर्ड देण्यात आला. मात्र यावेळी अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की, पंतला हा अवॉर्ड का देण्यात आला?
या सामन्यात ऋषभ पंतने तुफानी फलंदाजी केली नाही, मात्र तरीही त्याला प्लेयर ऑफ मॅच अवॉर्ड दिला होता. दरम्यान यावेळी पंतला त्याच्या फलंदाजीसाठी नव्हे तर त्याच्या उत्कृष्ट विकेटकिपींगसाठी गुजरातविरुद्धचा सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. गुजरात विरूद्धच्या सामन्यात त्याने स्टंपच्या मागे उत्तम चपळता दाखवत चार खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याने डेव्हिड मिलर (2), रशीद खान (31) आणि अभिनव मनोहर (8) आणि शाहरुख खान (0) यांना बाद केले. पंतने त्याच्या तत्परतेने गुजरात टायटन्सला स्वस्तात माघारी धाडण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.
पंतने हा अवॉर्ड जिंकल्यानंतर म्हटलं की, यानंतर खूश होण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. आमच्या संघाने दाखवून दिलं की आम्ही कसे खेळू शकतो. हे पाहून खरोखर आनंद झाला. या सामन्यातील गोलंदाजी नक्कीच सर्वोत्तमांपैकी एक होती. ही स्पर्धेची सुरुवात आहे. त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही.
स्वतःबद्दल सांगताना पंत म्हणाला, मैदानावर अधिक चांगल्या पद्धतीने कमबॅक करायचं आहे. जेव्हा मी रिहॅबमधून जात होतो तेव्हा माझा हाच विचार होता.
आयपीएलच्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात टायटन्सचा पराभव केला. गुजरातने दिल्लीला विजयासाठी 90 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातला 20 ओव्हरमध्ये केवळ 89 धावा करता आल्या होत्या. दिल्लीने गुजरातने दिलेलं आव्हान 4 विकेट्स गमावून 8.5 ओव्हरमध्ये 67 बॉलआधी पूर्ण केलं अन् मोठा विजय मिळवला. 67 चेंडू राखून हा सामना जिंकल्याने दिल्लीचा पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. सामन्याआधी दिल्लीकडे फक्त 4 गुण होते. तर दिल्लीचा नेट रनरेट -0.975 होता. मात्र या विजयानंतर दिल्लीकडे 2 गुण वाढले असून त्यांचा नेट रनरेट आता -0.074 झालाय.