'या दोन खेळाडूंना पाहून निवृत्ती घेतली'

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा कॉमेंटेटर संजय मांजरेकर स्वत:चं आत्मचरित्र घेऊन आला आहे

Updated: Feb 18, 2018, 09:14 PM IST
'या दोन खेळाडूंना पाहून निवृत्ती घेतली' title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा कॉमेंटेटर संजय मांजरेकर स्वत:चं आत्मचरित्र घेऊन आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर २१ वर्षानंतर संजय मांजरेकर त्याचं आत्मचरित्र घेऊन आला आहे. इंपरफेक्ट या पुस्तकातून संजय मांजरेकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट, मुंबईतलं क्रिकेट आणि कॉमेंट्रीचा अनुभव शेअर केला आहे.

१९९६मध्ये संजय मांजरेकरनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. संजय मांजरेकरनं या पुस्तकात त्याच्या अचानक निवृत्त व्हायच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. मी निवृत्त झालो तेव्हा माझी कामगिरी अजिबात वाईट नव्हती. पण मी जेव्हा सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारख्या खेळाडूंना बघितलं तेव्हा आपली निवृत्त व्हायची वेळ आल्याचं माझ्या लक्षात आलं, असं मांजरेकर या पुस्तकात म्हणाला आहे.

द्रविड-गांगुलीचं शानदार प्रदर्शन

राहुल द्रविड शानदार कामगिरी करेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती पण सौरव गांगुलीनं सगळ्यांना चकीत केलं. गांगुली कर्णधार बनण्यामागे रेकॉर्ड नाही तर त्याची प्रतिभा जबाबदार होती. द्रविड तर भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठीच बनला आहे, असं वाटत होतं. पण जेव्हा द्रविडला बॅटिंग करताना बघितलं तेव्हा आपली वेळ संपल्याचं मला कळलं, अशी प्रतिक्रिया मांजरेकरनं दिली आहे.

संजय मांजरेकरचं रेकॉर्ड

संजय मांजरेकर ११ वर्ष टेस्ट क्रिकेट आणि ८ वर्ष वनडे क्रिकेट खेळला. ३७ टेस्टच्या ६१ इनिंगमध्ये मांजरेकरनं ३७.१४ च्या सरासरीनं २०४३ रन्स बनवले. यामध्ये ४ शतकं आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. चार टेस्ट शतकांपैकी मांजरेकरनं २ शतकं पाकिस्तानविरुद्ध, एक वेस्ट इंडिज आणि एक झिम्बाब्वेविरुद्ध केलं.

वनडे क्रिकेटमध्ये मांजरेकरनं ७४ वनडेच्या ७० इनिंगमध्ये ३३.२३च्या सरासरीनं आणि ६४.३०च्या स्ट्राईक रेटनं १९९४ रन्स केले होते. यामध्ये एक शतक आणि १५ अर्धशतकांचा समावेश होता. वनडे क्रिकेटमधलं एकमेव शतक मांजरेकरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलं होतं.