क्रिकेटमधून का घेतली तडकाफडकी निवृत्ती? रिटायरमेंटनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया

सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर शिखर धवनने एका मुलाखतीत त्याने तडकाफडकी निवृत्ती का घेतली याबाबत खुलासा केला. 

Updated: Aug 24, 2024, 03:14 PM IST
क्रिकेटमधून का घेतली तडकाफडकी निवृत्ती? रिटायरमेंटनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया   title=
(Photo Credit : Social Media)

Shikhar Dhawan Retirement : भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी त्याने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. शिखरने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी देखील तो आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. निवृत्ती जाहीर केल्यावर शिखर धवनने एका मुलाखतीत त्याने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय का घेतला याबाबत खुलासा केला. 

शिखर धवनने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हंटले की, "असं नाही की हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. मी भावुक सुद्धा झालेलो नाही, मला रडायला सुद्धा येत नाहीये आणि मला तसं व्हायलाही नकोय. मी खूप खुश आहे की मी माझे अधिकांश जीवन क्रिकेट खेळताना व्यतीत केले. आता मला असं वाटतंय की मी एका टप्प्यावर येऊन पोहोचलोय जिथे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून बाजूला होत आराम करू शकतो".

हेही वाचा : Shikhar Dhawan किती श्रीमंत आहे? घटस्फोटानंतर आयशाला किती देतो पैसे?

धवनने पुढे म्हंटले की, "माझा टेस्ट डेब्यू माझ्यासाठी सर्वात फेव्हरेट होता. मी टीममध्ये आलो आणि मी रेकॉर्ड बनवला. मी त्यावेळी 187 धावा केल्या होत्या. मी नेहमी भारतासाठी खेळण्याचा आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचं स्वप्न बघत होतो. मला त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्डबाबत सुद्धा फार काही माहित नव्हतं. मी फक्त टेस्ट संघात माझं स्थान निश्चित करून खुश होतो". 

दीड वर्ष टीम इंडियात मिळाली नाही संधी : 

शिखर धवनने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्ध खेळला होता. मात्र त्यानंतर शिखरला टीम इंडियात स्थान मिळाले नव्हते. शिखर धवनने टीम इंडियाकडून 167  वनडे, 68 टी20 आणि 34 टेस्ट सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने वनडेत 6782 धावा, टेस्ट क्रिकेटमध्ये 1759 तर टी 20  मध्ये 2315  धावा केल्या आहेत. शिखर धवनने टेस्ट क्रिकेट खेळताना 7 शतक झळकावली. तर वनडेमध्ये त्याने 17 शतक ठोकली तर टी 20 मध्ये 11 अर्धशतक ठोकण्यात धवनला यश आले होते.