IND vs AUS : वर्ल्ड कप फायनलचा बदला घेणार का? कॅप्टन उदय सहारन म्हणतो 'जीवाचं रान करू पण...'

IND vs AUS, U19 World Cup 2024 : अंडर-19 टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारल्यावर कॅप्टन उदय सहारन (Uday Saharan) याने स्पष्ट भूमिका मांडली.

सौरभ तळेकर | Updated: Feb 10, 2024, 04:21 PM IST
IND vs AUS : वर्ल्ड कप फायनलचा बदला घेणार का? कॅप्टन उदय सहारन म्हणतो 'जीवाचं रान करू पण...' title=
India vs Australia, Uday Saharan Statement

Uday Saharan On World Cup Final : अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या रविवारी होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या दोन संघामध्ये चषकासाठी लढत होणार आहे. अंडर-19 विश्वचषकात (U19 World Cup 2024) आतापर्यंत भारतीय संघ अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. आत्तापर्यंत कर्णधार उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान आणि सौम्य पांडे या सर्वांनीच आतापर्यंत शानदार कामगिरी केलीये. त्यामुळे आता 9 व्यांदा फायनलमध्ये पोहोचलेली टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारल्यावर कॅप्टन उदय सहारन (Uday Saharan) याने स्पष्ट भूमिका मांडली.

उदय सहारन म्हणतो...

वर्ल्ड कप जिंकायचं हे भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचे स्वप्न आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला एकदाच मिळते, त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे प्रत्येकाचे ध्येय आहे. जेतेपद पटकावत स्पर्धेच्या इतिहासात नावही नोंदवायचे आहे, त्यामुळे रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत प्रत्येक खेळाडू त्याची सर्वोत्तम कामगिरी करण्यास आतूर असल्याचं उदय सहारन आत्मविश्वसाने सांगितलं.

जीवाचं रान करू पण...

देशबांधवांनी भारताच्या या युवा संघाला खंबीर पाठिंबा देत रहावं. हा संघ जेतेपदासाठी जीवाचं रान करेल, असं आवाहनही उदय सहारनने केलं आहे. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतून मोहम्मद कैफ, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जाडेजा अशी भारतीय गुणवत्ता चमकली आहे. मात्र या बड्या क्रिकेटपटूंसह तुलना करणं सहारन टाळतो, अशी तुलना करू नका, तसंही मी भूतकाळाचा विचार करत नाही. सध्या माझ्या मनात फक्त सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आणि माझ्या सहकाऱ्यांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचा विचार आहे, अशी ठाम प्रतिक्रिया उदय सहारन याने व्यक्त केली आहे.

वर्ल्ड कपचा बदला घेणार का?

गेल्यावर्षी कसोटी जगज्जेतेपद लढतीतही ऑस्ट्रेलियाने भारताला नमविलं होतं. मात्र या पराभवांचे उट्टे काढण्याचा विचार न करता अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित करणं उदय सहारन पसंत करतो. 'पराभवाची परतफेड करण्याचा विचारही माझ्या मनात नाही. आमच्या पूर्ण संघाने रविवारच्या अंतिम फेरीवर लक्ष केंद्रित केले आहे. सामन्यातील परिस्थितीनुसार खेळ करण्याचा विचारच मनात आहे. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. या स्पर्धेतील प्रत्येक संघ आव्हानात्मक होता आणि आहे', असं उदय सहारनने स्पष्टपणे म्हटलं आहे.

भारत अंडर 19 संघ: आदर्श सिंग, प्रियांशु मोलिया, रुद्र पटेल, सचिन धस, उदय सहारन (कर्णधार), आर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, अरवेली अवनिश राव (विकेटकीपर), इननेश महाजन (विकेटकीपर), आराध्या शुक्ला, धनुष गोवडा, मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.

ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ: हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), ऑलिव्हर पीक, लचलान एटकेन (डब्ल्यू), राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, कॅलम विडलर, रायन हिक्स, टॉम कॅम्पबेल, टॉम स्ट्रेकर, एडन ओ कॉनर, कोरी वॉस्ले.