मॉस्को: फ्रान्सने रविवारी क्रोएशियाला पराभूत करत पुन्हा एकदा इतिहास रचला. संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या या सामन्यामध्ये फ्रान्सनं 4-2 ने विजय मिळवला. फिफा वर्ल्डकपच्या 21 व्या सीजनचा हा खिताब फ्रान्सनं जिंकला. याआधी 1998 मध्ये फ्रान्सनं वर्ल्डकप जिंकला होता. फ्रान्सला 20 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकावर आपलं नाव कोरण्यात यश आलं.
इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर राहिला असला तरी कर्णधार हॅरी केनने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 6 गोल करत त्याने गोल्डन बूट मिळवला आहे. फुटबॉल वर्ल्डकप सुरु होण्याआधी इंग्लंड या सीजनमधला प्रबळ दावेदार मानला जात होता. केनने चांगली कामगिरी करत टीमला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं. त्याने 6 सामने खेळले आणि 6 गोल केले. केन फुटबॉल वर्ल्डकपचा गोल्डन बूट मिळवणारा दुसरा इंग्लंडचा खेळाडू आहे. याआधी 1986 मध्ये मॅक्सिकोमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये गॅरी लिनाकरने गोल्डन बूट जिंकला होता. लिनाकरने ही 6 गोल केले होते.
पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो, बेल्जियमचा रोमेलु लुकाकु, फ्रान्सचा अँटोनी ग्रीजमॅन, फ्रान्सचा एम्बाप्पे आणि रशियाचा डेनिस चेरीशेवने या सीजनमध्ये 4 गोल केले आहेत. लियोनेल मेसीने 1 तर ब्राझीलच्या नेमारने 2 गोल केले.