World cup 2019 : क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेयसीला प्रपोज करत प्रियकराचा षटकार

So this happened!

Updated: Jun 24, 2019, 09:26 AM IST
World cup 2019 : क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेयसीला प्रपोज करत प्रियकराचा षटकार
छाया सौजन्य- व्हिडिओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटल्यावर फक्त खेळच नव्हे, तर इथे भावभावनांनाही प्रचंड उधाण आलेलं असतं.  आजवर अनेकदा याचा प्रत्यय आला आहे. सध्या सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकातही याचीच पुनरावृत्तीही झाल्याचं स्पष्ट झालं. क्रिकेट विश्वचषकातील भारत- पाकिस्तान सामना खेळाडूंसाठी खास ठरला, पण सोबतच तो दोन क्रिकेटप्रेमींसाठी जरा जास्त खास होता. 

सामना खास ठरण्यामागचं कारणही तसंच होतं. कारण, एका क्रिकेटवेड्या चाहत्याने या सामन्याच्याच वेळी त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं. सोशल मीडियावर अन्विता नामक ट्विटर अकाऊंट युजरने तिच्यासोबत घडलेल्या या अविस्मरणीय प्रसंगाचा व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये हजारो उपस्थितांसमोरच तो तिला प्रपोज करताना दिसला. 

“So this happened”, असं कॅप्शन लिहित तिने हा व्हिडिओ शेअर केला. प्रेयसीला प्रपोज करतानाची धाकधूक त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. पण, तिने होकार देताच त्या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाल्याचंही व्हिडिओ पाहताना लक्षात येत आहे. मुख्य म्हणजे अनपेक्षितपणे अशा काही गोष्टी समोर आल्यावर बसणारा आश्चर्याचा धक्का नेमका काय आणि कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हि़डिओ. 

अनोख्या प्रेमकहाणीची ही झलक पाहून उपस्थित क्रिडारसिकही How`s the josh असं मोठ्या उत्साहात म्हणत त्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या. प्रेमाच्या आणाभाका घेणारे तर, अनेक असतात. पण, अशा आगळ्यावेगळ्या आणि कायमच स्मरणात राहील अशा प्रकारे प्रपोज करणाऱ्या या घटना कायमच आकर्षणाचा विषय ठरतात.