World Cup 2019 : क्रिकेट सुरु करणाऱ्या इंग्लंडचा वर्ल्ड कपचा दुष्काळ संपणार?

वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला

Updated: May 31, 2019, 04:14 PM IST
World Cup 2019 : क्रिकेट सुरु करणाऱ्या इंग्लंडचा वर्ल्ड कपचा दुष्काळ संपणार? title=

लंडन : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला, आणि आपण ही स्पर्धा जिंकण्यासाठी तयार असल्याचं दाखवून दिली. क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडला आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकता आला नाही. आता क्रिकेटचं महायुद्ध ब्रिटनच्याच मायभूमीत रंगत आहे. यामुळे अनेकजणांना इंग्लंड यावेळी तरी वर्ल्ड कपवर नाव कोरेल आणि इतिहास घडवेल असा विश्वास वाटत आहे.

यावेळेचा वर्ल्ड कप सायबांच्या देशात रंगत आहे. तब्बल २० वर्षांनी इंग्लंडच्या भूमीत वर्ल्ड कपचं आयोजन केलं गेलं आहे. यामुळे इंग्लंड टीमला वर्ल्ड कप जिंकण्याची ही नामी संधी असेल. इतिहासावर नजर टाकल्यास क्रिकेट खेळाचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडला वर्ल्ड कपवर एकदाही नाव कोरता आलेलं नाही. अगदी तीनवेळा हातातोंडाशी आलेला विजयही हिरावून गेला आहे.

१९७९, १९८७ आणि १९९२मध्ये इंग्लंडला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. यावेळी इंग्लंडच्या टीमला हा सारा इतिहास विसरून नव्या दमानं मैदानात उतरावं लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये इंग्लंडने आपल्यातील गुणवत्तेचं दर्शन घडवलं आहे. २०१८-१९मध्ये त्यांनी ६ पैकी ५ वनडे सीरिज जिंकल्या आहेत.

इंग्लंडच्या बॅटिंगची मदार असलेल्या जोस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्सनं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. याखेरीज जेसन रॉय, जो रूटसारखे बॅट्समन जगभरातील बॉलरचा धैर्यानं मुकाबला करु शकतात.

तर बॉलिंगमध्ये वेगवान बॉलरची धुरा मार्क वूड, डेविड विली, ख्रिस वोक्स, लिमा फ्लूकेट आणि टॉम कुरनवर असेल. तर आदिल राशिद आणि मोईन अली हे फिरकीची जादू दाखवू शकतात.

२०१५च्या वर्ल्ड कपनंतर इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये आणि टीममध्येही लक्षणीय बदल केले आहेत. त्याची प्रचिती गेल्या काही वर्षांमध्ये दिसूनही आली. २०१५मध्ये वनडे क्रिकेटमधील रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी असलेल्या इंग्लंडनं २०१९मध्ये अव्वलस्थानी झेप घेतली.

टीममध्ये संधी देण्यात आलेल्या खेळाडूंचा दृष्टीकोन हा आक्रमक असून अनेक खेळाडू प्रथमच वर्ल्ड कप खेळत आहेत. हा वर्ल्ड कप मायभूतीत रंगणार असल्यामुळे घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा तर असेलच याखेरीज कोणत्याही बाबींशी जुळवून घेण्याचं आव्हान नसेल. आता चालून आलेल्या नामी संधीचं सोनं करण्याचं आव्हान इंग्लंडसमोर असेल.