वॉशिंग्टन : गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांचं क्रिकेटप्रेम हे सर्वश्रुत आहे. शाळेमध्ये असताना आपण क्रिकेट खेळायचो, या खेळामध्ये आपल्याला रस होता, हे त्यांनी अनेकवेळा सांगितलं आहे. यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपबद्दलही पिचई यांनी भविष्यवाणी केली आहे. या वर्ल्ड कपची फायनल भारत आणि इंग्लंडमध्ये होईल, असं भाकीत पिचई यांनी वर्तवलं आहे. तसंच विराटच्या नेतृत्वात खेळणारी भारतीय टीम चांगली कामगिरी करून वर्ल्ड कप जिंकेल, अशी अपेक्षा पिचईंनी व्यक्त केली आहे.
युएसआयबीसीच्या इंडिया आयडियाज समिट या कार्यक्रमात बोलताना पिचई म्हणाले, 'वर्ल्ड कप फायनल भारत आणि इंग्लंड यांच्यात झाली पाहिजे. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या टीमही चांगल्या आहेत.'
या कार्यक्रमात सुंदर पिचई यांनी क्रिकेट आणि बेसबॉल या खेळांबद्दल आपले अनुभव सांगितले. 'जेव्हा मी पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली, तेव्हा हे आव्हानात्मक होतं. पहिल्याच मॅचमध्ये मी बॉल मागच्या बाजूला मारला. क्रिकेटमध्ये याची गणना चांगल्या शॉटमध्ये झाली असती, पण बेसबॉलच्या प्रेक्षकांनी याचं कौतुक केलं नाही. क्रिकेटमध्ये रन काढताना तुम्ही बॅट हातात धरून पळता, बेसबॉल खेळतानाही मी असंच केलं. तेव्हा हा खेळ जास्त आव्हानात्मक असल्याचं माझ्या लक्षात आलं. पण क्रिकेटवर माझं प्रेम कायम आहे.', असं पिचई म्हणाले.
'सध्या वर्ल्ड कप सुरू आहे. भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे,' असं वक्तव्य सुंदर पिचई यांनी केलं.