World Cup 2019 : हार्दिक पांड्याला पाहून स्टीव्ह वॉला आठवला हा खेळाडू

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. 

Updated: Jun 11, 2019, 10:21 PM IST
World Cup 2019 : हार्दिक पांड्याला पाहून स्टीव्ह वॉला आठवला हा खेळाडू title=

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनने शानदार शतक झळकावलं. तर हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर येऊन जोरदार फटकेबाजी केली आणि भारताचा स्कोअर ३५० च्या पुढे नेला. हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ बॉलमध्ये ४८ रन केले.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ याने या मॅचनंतर हार्दिक पांड्याचं कौतुक केलं आहे. स्टीव्ह वॉला हार्दिक पांड्याला पाहून दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लुजनरची आठवण झाली आहे. हार्दिक पांड्याची बॅटिंग आणि बॉलिंग स्टीव्ह वॉला लान्स क्लुजनरसारखी वाटते.

'विरोधी टीमकडे हार्दिक पांड्यासाठी कोणतीही रणनिती नाही. हार्दिकची ती खेळी विरोधी टीमना घाबरवेल. हार्दिक पांड्या १९९९ सालचा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या लान्स क्लुसनरसारखा आहे. हार्दिक पांड्याकडे बॅटिंगची अशी कला आहे, ज्याचं उत्तर विरोधी कर्णधारांकडे नाही,' असं स्टीव्ह वॉ आयसीसीच्या वेबसाईटवर लिहिलेल्या स्तंभामध्ये म्हणाला.

१९९९ च्या वर्ल्ड कपमध्ये लान्स क्लुजनरने ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणले होते. ऑस्ट्रेलियाचं नशीब बलवत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सेमी फायनल टाय झाली होती. सुपर ८ मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला फायनलचं तिकीट मिळालं होतं. या वर्ल्ड कपमध्ये स्टीव्ह वॉ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धूळ चारत वर्ल्ड कप जिंकला होता.

स्टीव्ह वॉ याने आपल्या लेखात धोनीचंही कौतुक केलं आहे. 'धोनी हा चतूर असून त्याच्यामध्ये संतुलन आहे. खूप कमीवेळा धोनी चुका करतो. धोनीच्या यशामुळे टीम इंडियाला ३५० रनचा पल्ला गाठता आला,' असं वक्तव्य वॉने केलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मॅचमध्ये टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ३५२ रन केले होते. यामध्ये शिखर धवनच्या ११७ रनचा समावेश आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ५० ओव्हरमध्ये ३१६ रनवर ऑलआऊट झाला. हार्दिक पांड्या आणि धोनीने शेवटी फटकेबाजी केली ज्याचा टीम इंडियाला फायदा झाला. यामुळे ऑस्ट्रेलियाचा ३६ रननी पराभव झाला.

p>