साऊथम्पटन : २०१९ वर्ल्ड कपच्या टीम इंडियाच्या पहिल्याच मॅचनंतर एमएस धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या मानचिन्हावरून वाद सुरु झाला आहे. धोनीच्या या मानचिन्हावर आयसीसीने आक्षेप घेतला आहे. धोनीने त्याच्या ग्लोव्हजवरून हे मानचिन्ह काढून टाकावं, असं आयसीसीने धोनीला सांगितलं आहे.
आयसीसीच्या नियमांप्रमाणे राजकीय, धार्मिक किंवा वाशिंक संदेश जाईल असं कोणतंही साहित्य आणि कपडे क्रिकेट सामन्यांमध्ये वापरता येत नाही. आता आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनी हे मानचिन्ह असलेलं ग्लोव्हज वापरतो की नाही याकडेच आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.
आयसीसीबरोबरच भारतातल्या लष्करी अधिकाऱ्यांनीही धोनीच्या या ग्लोव्हजवर आक्षेप घेतले आहेत. हे मानचिन्ह सैन्यात विशेष प्रशिक्षण घेतल्यावरच वापरता येऊ शकतं असं लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. माहीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय लष्कराच्य पॅरा कमांडोज या विशेष फोर्सचं मानचिन्ह आपल्या ग्लोव्हजवर वापरलं होतं.
या चिन्हावर बलिदान असं लिहिण्यात आलं होतं. पॅरा स्पेशल फोर्समध्ये काम केलेल्यांनाच 'बलिदान'चं हे चिन्ह वापरण्याची परवानगी असते. धोनीला २०११ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून गौरवण्यात आलं होतं.
सैन्यदलाशी संबंधीत हे चिन्ह पहिल्यांदाच वापरात आणण्याची ही धोनीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही टोपीपासून ते मोबाईलच्या कव्हरपर्यंत अनेकदा त्याने या चिन्हाला पसंती दिली होती.
MS has a mobile case with Balidan. Also during IPL he was wearing cap with Balidan. His love and respect for Para SF is above all. #Balidan #ParaSF pic.twitter.com/f2C01jnvUB
— Prabhu (@Cricprabhu) June 5, 2019
भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू होण्याची इच्छा असल्याचं धोनीने अनेकदा सांगितलं होतं. क्रिकेटमध्ये त्याच्या कर्तृत्वाची उंची पाहता भारतीय लष्कराकडून २०११ मध्ये त्याला मानाचं असं लेफ्टनंट कर्नल पद बहाल करण्यात आलं होतं. ज्यानंतर तो 106 Para TA च्या सेवेत होता. मुख्य म्हणजे त्याने पॅरा बेसिक प्रशिक्षणही पूर्ण केलं होतं. शिवाय, पाचवेळा पॅरा जम्प मारत त्याने पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.