World Cup 2019 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारतीय गोलंदाज सज्ज 

Updated: Jun 30, 2019, 02:50 PM IST
World Cup 2019 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
छाया सौजन्य- ट्विटर

बर्मिंघम : क्रिकेट विश्वचषकामध्ये अपराजित असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा सामना रविवारी बर्मिंघम येथे पार पडत आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकली आहे. ज्यानंतर संघाने प्रथम खेळीत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

इंग्लंडसोबतच्या या सामन्यात भारतीय संघात एक बदल केला गेल्याची माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. दुखापतग्रस्त विजय शंकरऐवजी या सामन्यासाठी ऋषभ पंतला स्थान देण्यात आलं आहे. 

आतापर्यंत झालेल्या एकूण सहा क्रिकेट सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाने पाच विजय मिळवले असून, एक सामना अनिर्णित राहिला होता. भारताची ही विजयाची मालिका या सामन्यातही अशीच अबाधित राहते का, याकडेच साऱ्या क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. सध्याच्या घडीला ११ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता संघाच्या कामगिरीवरच साऱ्यांचं लक्ष असेल. 

इंग्लंडच्या संघाच्या फलंदाजीला भेद देण्यासाठी भारतीय संघाच्या गोलंदाजांवर विशेष मदार असणार आहे. फिरकी आणि जलदगती गोलंदाजांची फळी प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येवर रोखते हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

मागील २७ वर्षांमध्ये विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला कधीच पराभूत केलेलं नाही. पण, यावेल मात्र इंग्लंडच्या संघाचा एकंदर फॉर्म पाहता भारतीय संघाला ते तगडी टक्कर देणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. त्यमुळे खऱ्या अर्थाने दोन्ही संघांच्या कामगिरीकडे साऱ्या क्रीडाविश्वाची नजर असेल.