बर्मिंघम : कर्नाटकचा ओपनर मयंक अग्रवाल वर्ल्ड कप खेळण्यासाठी बुधवारी टीम इंडियामध्ये सामील झाला. ऑलराऊंडर विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे मयंक अग्रवालला इंग्लंडला बोलावण्यात आलं. मयंक अग्रवालची निवड आश्चर्यकारक मानली गेली. कारण आरक्षित खेळाडूंमध्ये अंबाती रायुडूचं नाव असतानाही मयंक अग्रवालला संधी मिळाली. कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी मयंक अग्रवालच्या नावाला पसंती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वात १५ सदस्यीय टीमची निवड करण्यात आली होती. त्यावेळी आरक्षित खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रायुडूऐवजी मयंकला संधी देण्याचा निर्णय ५ सदस्यांच्या निवड समितीने नाही तर टीम प्रशासनाने घेतला. शंकरऐवजी मयंक अग्रवाल टीममध्ये पाहिजे असल्याचं टीम प्रशासनाने सांगितलं, त्यामुळे निवड समितीने यावर चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता, असं सूत्रांनी सांगितलं.
ओपनर मयंक अग्रवालची टीममध्ये निवड झाल्यामुळे केएल राहुलला पुन्हा चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात येईल. यामुळे टीमचं संतुलन चांगलं राहिलं, असंही बोललं जात आहे.
इंडिया-ए कडून खेळताना केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदाही मयंक अग्रवालला झाल्याचं सांगितलं जात आहे. इंडिया ए कडून खेळताना वनडे सीरिजमध्ये मयंकने ४ इनिंगमध्ये २ शतकांसह २८७ रन केले. लिस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यामध्येही त्याने १५१ रनची खेळी केली होती.
वर्ल्ड कपमधला भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी शनिवारी होणार आहे. या मॅचमध्ये मयंक अग्रवालला संधी मिळते का? हे पाहणं औत्सुक्याचं असेल. या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा प्रवेश झाला आहे.