मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपला आता १०० पेक्षा कमी दिवस बाकी आहेत. पण भारताची चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची समस्या मात्र अजून कायम आहे. मागच्या सहा महिन्यांपासून भारतीय टीम अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी योग्य असल्याचं भारतीय टीमला वाटत होतं. पण पहिले रवी शास्त्री आणि आता निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विराट कोहलीच चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो, असे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे रोहित शर्मानं एमएस धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळवावं अशी मागणी केली आहे.
हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये एमएसके प्रसाद म्हणाले, 'विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याचा विचार चांगला आहे. कोहली चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो. ही योजना काही वेळापुरतीच असू शकते. आम्ही विराटला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना बघितलं आहे. तो जगातला पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन आहे.'
'जर टीमला विराटनं चौथ्या क्रमांकावर खेळावं, असं वाटत असेल तर तसा निर्णय ते घेतील. पण तरी टीमला काय पाहिजे आणि टीमचं संतुलन कसं आहे, हे देखील पाहावं लागेल. यावरूनच विराटचा बॅटिंग क्रमांक ठरवला जाईल', असं एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं.
विराट कोहलीनं भारतीय टीममध्ये एकूण सात क्रमांकांवर बॅटिंग केली आहे. यातल्या तिसऱ्या क्रमांकावर विराट सर्वात यशस्वी राहिला. कोहलीनं २०११ पासून तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत ३२ शतकं केली. तर चौथ्या क्रमांकावर विराटनं २३ इनिंगमध्ये बॅटिंग केली. यादरम्यान कोहलीनं ५८.१३ च्या सरासरीनं १,७४४ रन केल्या. यामध्ये सात शतकांचा समावेश आहे.
याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते, ' आम्ही आमच्या सुरुवातीच्या ३ बॅट्समनना परिस्थितीनुसार वेगळे करू शकतो. ही गोष्ट आमच्यासाठी चांगली आहे. विराटसारखा खेळाडू चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला, तर आम्ही तिसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या बॅट्समनचा विचार करू शकतो. मोठ्या स्पर्धेसाठी अशा लवचीकतेची गरज असते. अंबाती रायुडू किंवा दुसरा बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. कोहलीला चौथ्या क्रमांकावर पाठवून आमचे टॉप तीन बॅट्समन वेगळे करून आमची बॅटिंग आणखी मजबूत होईल.'