World Cup 2019: धोनीच नाही तर या भारतीयांचाही शेवटचा वर्ल्ड कप?

स्वत:च्या देशाला एकदा तरी वर्ल्ड कप जिंकवून द्यायचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू बघतो.

Updated: Mar 5, 2019, 02:25 PM IST
World Cup 2019: धोनीच नाही तर या भारतीयांचाही शेवटचा वर्ल्ड कप? title=

मुंबई : स्वत:च्या देशाला एकदा तरी वर्ल्ड कप जिंकवून द्यायचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू बघतो. काहींचं हे स्वप्न पूर्ण होतं तर कित्येकांचं हे स्वप्न अपूर्ण राहतं. इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही अशाच प्रकारे खेळाडू जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरतील. भारताच्या दृष्टीनं विचार केला तर काही खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. धोनीसह असे ५ भारतीय खेळाडू आहेत, जे २०२३ सालचा वर्ल्ड कप खेळू शकणार नाहीत. या खेळाडूंवर एक नजर टाकूयात.

केदार जाधवचा पहिला वर्ल्ड कप

केदार जाधव हा सध्या टीममध्ये ऑल राऊंडर म्हणून खेळत आहे. केदार जाधवची भारतीय टीममधील भूमिका फिनिशर आणि स्पिनर म्हणून आहे. २०१९ चा वर्ल्ड कप सुरू होईल तेव्हा केदार जाधवचं वय ३४ वर्ष असेल. तर २०२३ पर्यंत केदार जाधव ३८ वर्षांचा होईल. त्यामुळे हा केदारचा पहिला आणि शेवटचा वर्ल्ड कप ठरू शकतो.

शिखर धवनचा दुसरा वर्ल्ड कप

शिखर धवन आणि रोहित शर्मा हे फक्त भारताचेच नाही तर जगातले सगळ्यात यशस्वी ओपनर आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनची बॅट नेहमीच तळपते. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये त्याचं खेळणं जवळपास निश्चित आहे. २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये धवन हा ५वा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता. पण जास्त काळ फॉर्ममध्ये न राहणं धवनची कमजोरीही आहे. २०१९ मध्येच शिखर धवन दोनवेळा शून्यवर आऊट झाला आहे. देशातले अनेक ओपनर हे भारतीय टीममध्ये प्रवेश करण्यासाठी दार ठोठावत आहेत. धवन हा सध्या ३३ वर्षांचा आहे. २०२३ वर्ल्ड कपपर्यंत धवन ३७ वर्षांचा होईल.

रायुडूचा पहिला आणि शेवटचा वर्ल्ड कप

भारतीय टीममध्ये सध्या अंबाती रायुडू हा चौथ्या क्रमांकावर खेळत आहे. चौथ्या क्रमांकासाठी रायुडू हा आदर्श खेळाडू असल्याचं कोहलीनं सांगितलं होतं. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये रायुडू चौथ्या क्रमांकावरच खेळेल हे जवळपास निश्चित आहे. असं असलं तरी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिलेल्या संकेतानुसार भारतीय टीम चौथ्या क्रमांकासाठी वेगळ्या खेळाडूचाही विचार करु शकते. अंबाती रायुडू हा सध्या ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे पुढच्या वर्ल्ड कपमध्ये तो खेळणार नाही हे जवळपास निश्चित आहे.

धोनी शेवटचा वर्ल्ड कप जिंकवणार?

धोनीच्या नेतृत्वात भारतानं २ वर्ल्ड कप जिंकले आहेत. २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये आणि २०११ सालच्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला. धोनी हा सध्या ३७ वर्षांचा आहे, त्यामुळे तो २०२३ सालचा वर्ल्ड कप खेळणार नाही. अशात धोनी भारताला तिसरा वर्ल्ड कप जिंकवून देण्यासाठी मैदानात उतरेल.

दिनेश कार्तिकचाही शेवटचा वर्ल्ड कप?

३३ वर्षांचा दिनेश कार्तिक पाचवा असा खेळाडू आहे ज्याचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकेल. दिनेश कार्तिक हा मागच्या महिन्यापर्यंत भारतीय टीमचा महत्त्वाचा भाग होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारताच्या वनडे टीममधून कार्तिकला डच्चू देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिनेश कार्तिकचा विचार फिनिशर म्हणून केला जात होता. पण आता केदार जाधवकडे ही भूमिका देण्यात आली आहे. असं असलं तरी दिनेश कार्तिककडून अपेक्षा संपलेल्या नाहीत. कारण ऋषभ पंतनं अजून मर्यादित ओव्हरमध्ये चमकदार कामगिरी केलेली नाही. अशात पुन्हा एकदा दिनेश कार्तिकचा वर्ल्ड कपच्या टीमसाठी विचार होऊ शकतो.