close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांचे त्यांच्याच खेळाडूंना अपशब्द

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. 

Updated: Jun 17, 2019, 09:26 PM IST
World Cup 2019 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांचे त्यांच्याच खेळाडूंना अपशब्द

मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. याचबरोबर भारताचं पाकिस्तानविरुद्धचं वर्ल्ड कपमधलं विजयाचं रेकॉर्डही कायम राहिलं. पण भारताविरुद्धचा हा पराभव पाकिस्तानी चाहत्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. मॅच संपल्यानंतर खेळाडू पॅव्हेलियनमध्ये जात असताना स्टेडियममध्ये असलेल्या काही पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्याच खेळाडूंविषयी अपशब्द काढले.

मैदानाबाहेरही पाकिस्तानी चाहत्यांची काही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. पाकिस्तानी खेळाडू हे पिझ्झा आणि बर्गर खाऊन जाडे झाले आहेत. फिटनेस नसलेले हे खेळाडू काय क्रिकेट खेळणार, असे सवाल पाकिस्तानी चाहत्यांनी विचारले. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद मॅच सुरु असताना मैदानातच जांभाई देताना दिसला, यावरुनही सरफराजवर टीका करण्यात येत आहे. पाकिस्तानी चाहत्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दुसरीकडे शून्यावर बाद होणारा शोएब मलिक आणि इमाम उल हक हे सामन्यापूर्वी एका हुक्का पार्लरमध्ये मौजमजा करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी या पराभवाला खेळाडूंच्या मौजमजेलाही जबाबदार धरलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओ शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा देखील दिसत आहे. 

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सगळ्या ७ मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आहे.