मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे. या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानला ३३७ रनची गरज आहे. रोहित शर्माचं धमाकेदार शतक आणि विराट कोहली, केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने या स्कोअरपर्यंत मजल मारली.
या मॅचमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या काही ओव्हरमध्ये संयमी खेळी केल्यानंतर दोघांनी हाणामारी करायला सुरुवात केली. राहुल आणि रोहित यांच्यामध्ये १३६ रनची पार्टनरशीप झाली.
केएल राहुलने ७८ बॉलमध्ये ५७ रन केले. राहुलची विकेट गेल्यानंतर रोहितने विराटच्या मदतीने रनची गती कायम ठेवली. ११३ बॉलमध्ये १४० रन करुन रोहित शर्मा माघारी परतला. रोहितच्या या खेळीमध्ये १४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २४वं शतक होतं.
रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता, पण टीम इंडियाच्या दुसऱ्या बाजूने विकेट जात होत्या. हार्दिक पांड्या १९ रनवर आणि धोनी १ रनवर आऊट झाला. यानंतर पावसाचा व्यत्यय आला. पावसानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर विराट कोहलीनं विकेट गमावली. विराटने ६५ बॉलमध्ये ७७ रन केले.
पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर हसन अली आणि वहाब रियाजला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ मॅच झाल्या आहेत. यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ या वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान एकमेकांना भिडले होते.