close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : टीम इंडियाला धक्का, शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Updated: Jun 19, 2019, 04:59 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियाला धक्का, शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर

मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ओपनर शिखर धवन हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ९ जूनरोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये शिखर धवनने ११७ रनची खेळी केली होती.

शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली तरी टीम इंडियाने आयसीसीकडे बदली खेळाडूची मागणी केली नव्हती. धवनची दुखापत १०-१२ दिवसात बरी होईल, असा अंदाज होता. पण धवनची दुखापत बरी व्हायला ४ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय आयसीसीकडे बदली खेळाडूला परवानगी द्यावी अशी मागणी करणार आहे.

शिखर धवनऐवजी ऋषभ पंत याची टीममध्ये निवड केली जाणार आहे. शिखर धवनची दुखापत बघता याआधीच ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पर्याय म्हणऊन पाठवण्यात आलं होतं. आयसीसीची परवानगी मिळाल्यानंतर ऋषभ पंतचा टीममध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होईल.

१६ जूनला पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी शिखर धवनऐवजी केएल राहुल ओपनिंगला आला होता. या मॅचमध्ये राहुलने ५७ रन केले होते. राहुलने रोहितसोबत १३६ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली होती.

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना २२ जूनरोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये ऋषभ पंतला संधी मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर होणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये धवनने ६ शतकं केली आहेत. यातली ३ शतकं वर्ल्ड कपमधली आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये धवनची कामगिरी कायमच उल्लेखनीय राहिली आहे.