साऊथम्पटन : २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे. स्पर्धेतल्या पहिल्या दोन्ही मॅच दक्षिण आफ्रिकेने गमावल्या. याचसोबत त्यांच्या टीमला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. डेल स्टेन दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला. तर लुंगी एनगिडी दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मॅचला मुकला. इंग्लंडविरुद्धच्या वनडेमध्ये हाशिम अमलाच्या हेल्मेटला बॉल लागला. यानंतर आमला बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये खेळू शकला नाही.
लुंगी एनगिडी आणि हाशिम आमलाची दुखापत फारशी गंभीर नसली तरी डेल स्टेनच्या दुखापतीमुळे मात्र दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डुप्लेसिसने स्टेनच्या दुखापतीला अप्रत्यक्षपणे आयपीएलला जबाबदार धरलं आहे. जर स्टेन आयपीएलमधून बंगळुरूकडून त्या दोन मॅच खेळला नसता, तर काय झालं असतं माहिती नाही, पण या गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया फॅफने दिली.
'डेल स्टेनने मागच्या अडीच वर्षांमध्ये बराच संघर्ष केला. त्याला या कठीण काळामध्ये समर्थन द्यायची गरज आहे. फिट होण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली होती. वर्ल्ड कपआधी त्याने सर्वोत्तम बॉलिंग केली होती. पण आयपीएलमध्ये त्याने दोन मॅच खेळल्या आणि तिकडे त्याला दुखापत झाली,' असं फॅफ म्हणाला.
डेल स्टेनने नेट प्रॅक्टिसही केली, पण तो लयीमध्ये दिसला नाही. सोमवारी स्टेनने हाशिम आमलाला बॉलिंगही केली होती. डेल स्टेनऐवजी आता वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने डावखुरा फास्ट बॉलर ब्युरन हेन्ड्रिक्सची निवड केली आहे.