साऊथम्पटन : वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. या मॅचआधी दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाने भारताचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला. विराट कोहली हा अपरिपक्व खेळाडू आहे, अशी टीका रबाडाने केली. रबाडाच्या या टीकेला विराट कोहलीने प्रत्युत्तर दिलं आहे. याबद्दल मी रबाडाला मैदानातच उत्तर देईन, असं विराट म्हणाला.
'मी रबाडाविरुद्ध अनेकवेळा खेळलो आहे. याबद्दल मला पत्रकार परिषदेमध्ये बोलायची गरज नाही. आम्ही दोघं भेटू तेव्हा याबद्दल एकमेकांशी बोलू. तो जागतिक दर्जाचा बॉलर आहे. कोणतीही बॅटिंग उद्दध्वस्त करण्याची योग्यता रबाडामध्ये आहे,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
विराट कोहलीसोबत आयपीएलमध्ये झालेल्या वादानंतर रबाडाने भाष्य केलं होतं. 'विराटने माझ्या बॉलिंगवर फोर मारली आणि यानंतर तो मला काहीतरी बोलला. पण तुम्ही विराटला काही बोललात तर तो लगेच चिडतो. स्वत:च्या खेळाला उत्तेजन देण्यासाठी तो असं करत असेल, पण हा अपरिपक्वपणा आहे. तो उत्कृष्ट खेळाडू आहे, पण त्याच्यावर निशाणा साधलेलं त्याला आवडत नाही.', असं वक्तव्य रबाडाने केलं होतं.
खांद्याच्या दुखापतीमुळे डेल स्टेन वर्ल्ड कपमधून बाहेर झाला. याबद्दलही विराट कोहली बोलला. 'स्टेनसाठी मला वाईट वाटत आहे. जेव्हा तो आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळत होता, तेव्हा खुश होता. त्यावेळी स्टेन चांगली बॉलिंगही करत होता. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळण्यासाठी तो उत्सुक होता. पण त्याची सध्याची मनस्थिती मी समजू शकतो,' असं विराट म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर खूप शिकल्याचं विराट कोहलीने सांगितलं.