लंडन : २०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. यंदाचा वर्ल्ड कप हा ग्रुप स्टेजमध्ये खेळवण्यात येत नसून राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. याआधी १९९२ साली या फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचे टीमना फायदे असले तरी याची बरीच आव्हानं देखील आहेत.
राऊंड रॉबिन फॉरमॅट म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतात. या वर्ल्ड कपमध्ये १० टीम सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक टीम ही ९ मॅच खेळणार आहे. ९ मॅच झाल्यानंतर सर्वाधिक पॉईंट्स मिळवणाऱ्या ४ टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. जर टीमचे पॉईंट्स समान असल्यास नेट रनरेट जास्त असलेली टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. जर नेट रनरेटही सारखा असेल तर त्या २ टीममध्ये आधी झालेल्या मॅचमध्ये जी टीम जिंकली आहे, त्या टीमला सेमीफायनलचं तिकीट मिळेल.
राऊंड रॉबिनच्या फॉरमॅटमुळे प्रत्येक टीमला स्पर्धेमध्ये समान संधी मिळते. याआधी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेज फॉरमॅटमुळे काही टीमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. ग्रुप ऑफ डेथ म्हणजेच एखाद्या ग्रुपमध्ये असलेल्या टीममध्ये जास्त स्पर्धा असायची, त्यामुळे काही टीमचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात यायचं, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये असलेल्या टीमना अनेकवेळा कमकुवत टीम मिळायचा. यामुळे समान स्पर्धा होत नसल्याची टीकाही व्हायची.
२००७ वर्ल्ड कपवेळी एका ग्रुपमध्ये बांगलादेशने भारताचा तर दुसऱ्या ग्रुपमध्ये आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव केला होता. यामुळे २००७ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं होतं. २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्येही बांगलादेशने इंग्लंडचा पराभव करत त्यांना ग्रुप स्टेजमध्येच बाहेर काढलं होतं.
राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये आयसीसीचं आर्थिक गणितही आहे. राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळणार आहे. सगळ्या टीममधली स्पर्धा बघता सेमीफायनलच्या टीम या शेवटच्या काही मॅचमध्ये ठरण्याची शक्यता अधिक आहे. याचा थेट फायदा स्पर्धात्मकता वाढण्यावर आणि यामुळे आयसीसचा आर्थिक फायदा होण्यात आहे.
२००७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानची टीम ग्रुप स्टेजमध्येच बाद झाल्या होत्या, यामुळे आयसीसीचं मोठं नुकसान झालं होतं. आर्थिक फायद्यासाठी आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानच्या किमान एक सामन्यासाठी प्रयत्न करते, असा आरोपही याआधी झाला आहे.
राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने स्पर्धेचा कालावधी वाढणार आहे. ज्यामुळे खेळाडूंना त्यांच्या फिटनेसची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच अशा स्पर्धांमध्ये योग्यवेळी फॉर्ममध्ये येणं हे जास्त महत्त्वाचं असतं. एखादी टीम स्पर्धेच्या सुरुवातीला फॉर्ममध्ये असेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये टीमचा फॉर्म अचानक ढासळतो आणि मग सेमीफायनलमध्ये प्रवेश न मिळण्याचा धोका उद्भवतो.