World Cup flashback : वर्ल्ड कपची ती फायनल, वेस्ट इंडिजच्या भेदक बॉलिंगने १२ रनमध्ये घेतल्या ८ विकेट

२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.

Updated: Jun 3, 2019, 09:56 PM IST
World Cup flashback : वर्ल्ड कपची ती फायनल, वेस्ट इंडिजच्या भेदक बॉलिंगने १२ रनमध्ये घेतल्या ८ विकेट title=

मुंबई : २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. ४४ वर्षांपूर्वी म्हणजेच १९७५ साली पहिल्यांदा वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर झालेल्या ११ वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणावर बदललं. क्रिकेट जगतावर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये वेस्टइंडिजचा दबदबा राहिला. कॅरेबियन टीमने आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धी टीमला चांगलाचा घाम फोडला.

वर्ल्ड कपची दुसरी स्पर्धा म्हणजेच १९७९ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजने धमाकेदार कामगिरी केली होती. १९७९ चा वर्ल्ड कपची फायनल मॅच वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेली. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ६० ओव्हरची मॅच खेळली जायची. वेस्ट इंडिजने प्रथम बॅटिंग करत निर्धारित ६० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २८९ रन केल्या.

वेस्ट इंडिजने इंग्लंडला विजयासाठी २९० रनचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची दमदार सुरुवात झाली. इंग्लंडकडून पहिल्या विकेटसाठी माइक ब्रेअर्ली आणि जेफ्री बॉयकॉट या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १२९ रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडने पहिली विकेट माइक ब्रेअर्लीच्या रुपात गमावली. तो ६४ रन करुन आऊट झाला. त्यानंतर लगेचच जॉफ्री बॉयकॉट १३५ स्कोअर असताना आपली विकेट गमावून बसला. त्यामुळे टीमचे दोन्ही सेट ओपनर माघारी परतले होते.

आता इंग्लंडची अवस्था १३५-२ अशी झाली होती. मैदानात दोन्ही नवे खेळाडू होते. ग्रॅहम गूच आणि डेरेक रॅन्डल या दोघांनी टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ रन जोडल्या. इंग्लंडला तिसरा धक्का १८३ स्कोअर असताना लागला. ग्रॅहम गूच ३२ रन करुन आऊट झाला.

यानंतर इंग्लंडचा डाव पत्त्याच्या पानांप्रमाणे फिस्कटला. इंग्लंडचा स्कोअर १८३/३ असा होता आणि इंग्लंडची टीम १९४ रनवर आऊट झाली. म्हणजेच इंग्लंडने आपले ८ विकेट अवघ्या १२ रनच्या मोबदल्यात गमावले.

वेस्ट इंडिजच्या जोएल गार्नरच्या भेदक माऱ्यापुढे एकाही बॅट्समनला टिकता आले नाही. इंग्लंडच्या ५ बॅट्समनना भोपळा देखील फोडता आला नाही. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक ५ विकेट या जोएल गार्नरने घेतल्या. तर कोलिन क्रॉफ्टने ३ आणि मायकेल होल्डिंगने २ विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिजने ही फायनल मॅच ९२ रनने जिंकली. या विजयामुळे वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप ट्रॉफीवर लागोपाठ दुसऱ्यांदा आपले नाव कोरले.