'ICC ने भारतीय गोलंदाजांसाठी वेगळे...', पाकिस्तानी खेळाडूचा गंभीर आरोप, आकाश चोप्रा म्हणाला 'तुम्ही ना जरा...'

वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू हसन राजा याने आता थेट आयसीसीवर आरोप केला आहे. भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू दिला जात असून, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याने जाहीरपणे केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 3, 2023, 01:43 PM IST
'ICC ने भारतीय गोलंदाजांसाठी वेगळे...', पाकिस्तानी खेळाडूचा गंभीर आरोप, आकाश चोप्रा म्हणाला 'तुम्ही ना जरा...' title=

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाने अत्यंत खराब कामगिरी केली असल्याने टीकेची झोड उठली आहे. पाकिस्तान संघावर टीका होत असतानाच दुसरीकडे पीसीबी प्रमुख आणि बाबर आझम यांच्यातील कथित संभाषण व्हायरल झालं आहे. यामुळे माजी खेळाडू नाराजी जाहीर करत असून, बोर्डात अनेक बदल करण्याची गरज व्यक्त करत आहेत. पण दुसरीकडे काही माजी खेळाडू मात्र अद्यापही संघाची बाजू घेत याउलट आयसीसीवर आरोप करत आहेत. पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू हसन राजा याने आता थेट आयसीसीवर आरोप केला असून, भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू दिला जात असून, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. 

गुरुवारी भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी मोठा पराभव केला. भारताचा वर्ल्डकपमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. यानंतर पाकिस्तान न्यूज चॅनेलवर झालेल्या चर्चेत हसन राजा यांनी आयसीसी किंवा अम्पायर्स भारतीय संघाला नवीन चेंडू देत आहेत का? याची पाहणी झाली पाहिजे अशी मागणीच केली आहे. 

"आम्हाला समजत नाही आहे की, हे फलंदाज इतर संघांविरोधात चांगले खेळतात. पण जेव्हा भारतीय संघातील मोहम्मद शमी, सिराज गोलंदाजी करतात तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेच्या अॅलन डोनाल्ड आणि मखाया यांच्यासारखे वाटतात. तेव्हा चेंडूच्या एका बाजूला चमक असायची आणि चेंडू स्विंग होत असे. पण आता तर प्रत्येक डावानंतर चेंडू बदलतात असं वाटत आहे. आयससी, अम्पायर्स, थर्ड अम्पायर किंवा बीसीसीआय हे चेंडू देत असेल तर त्याची पाहणी झाली पाहिजे," असं हसन राजा म्हणाले आहेत. 

हसन राजा यांच्या या मागणीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत त्याने आश्चर्य व्यक्त करत खडेबोल सुनावले आहेत. तुमचं हेच गंभीर क्रिकेट आहे का? अशी विचारणा त्याने केली आहे. 

"हा एक गंभीर क्रिकेट शो आहे का? नसेल तर मग 'सटायर' 'कॉमेडी' असं इंग्रजीत सगळीकडे लिहा. तुम्ही उर्दूमध्ये कदाचित लिहिलं असावं, पण दुर्दैवाने मला ते वाचता येत नाही," अशी टीका आकाश चोप्राने केली आहे.

भारताचा सलग सातवा विजय

भारताने वानखेडे मैदानात श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्डकपमधील आपल्या सलग सातव्या विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने 357 धावांचा डोंगर उभा केला. शुभमन, विराट आणि श्रेयसने तुफान फटकेबाजी केली. तिघांचंही शतक थोडक्यात हुकलं. 

दरम्यान भारताने श्रीलंकेला फक्त 55 धावांत गारद केलं. मोहम्मद शमीने 5  तर सिराजने 3 विकेटस घेतले. भारताने 302 धावांनी हा सामना जिंकला.