Team India World Cup 2023: क्रिकेट वर्ल्डकप 2023 चं वेळापत्रक (World Cup Time Table) जाहीर झालं असल्याने आता सर्व क्रिकेटरसिकांना ही स्पर्धा कधी सुरु होणार याचे वेध लागले आहेत. यावेळी भारतात वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं असल्यानेही क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 5 ऑक्टोबरला इंग्लंड (England) आणि न्यूझीलंडच्या (New Zeland) सामन्यासह स्पर्धेचं रणशिंग फुंकलं जाईल. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) होणार आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईत (Chennai) हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघ वर्ल्डकपसाठी कोणत्या खेळाडूंना संधी देणार यासंबंधी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यातच आता भारतीय संघाच्या एका खेळाडूचं नाव समोर येत आहे.
भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या मोहम्मद सिराजला संधी देण्याची शक्यता आहे. मोहम्द सिराजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नुकतंच झालेल्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातही त्याला संधी देण्यात आली आहे. मोहम्मद सिराजसह कुलदीप यादववरही विश्वास दाखवला जाण्याची शक्यता आहे.
मोहम्मद सिराज सध्या एकदिवसीय क्रिकेटमधून भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 8 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 13.21 टक्के होती. त्याने दोन वेळा चार विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजला भारतीय संघात स्थान मिळणं जवळपास निश्चित आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातही मोहम्मद सिराज खेळणार आहे. तर दुसरीकडे यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुलदीप यादव सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय क्रिकेट संघ कुलदीप यादववरही विश्वास दाखवू शकतो. त्याने यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 गडी बाद केले आहेत. कुलदीप यादवही वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघाचा भाग आहे. त्यामुळे कुलदीप यादवकडे चांगली कामगिरी करत वर्ल्डकप संघात आपलं स्थान निश्चित करण्याची चांगली संधी आहे.
याशिवाय भारतीय संघ इतर गोलंदाजांचाही विचार करत असून, त्यांच्या कामगिरीकडे लक्ष आहे. यामध्ये मुकेश कुमार, शार्दूल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांचा सहभाग आहे. उनाडकट बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे.
वर्ल्डकपआधी भारतीय संघ चार देशांविरोधात मालिका खेळणार आहे. यामध्ये वेस्ट इंडिजसह आयरलँडचाही समावेश आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. 12 जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.